प्रभागात जाहीर सभांची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2017 12:44 AM2017-04-11T00:44:39+5:302017-04-11T00:44:39+5:30
चंद्रपुरात मनपा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
उमेदवारांच्या कॉर्नर सभा : मंत्र्यांसह सर्वच राजकीय नेते लागले कामाला
चंद्रपूर : चंद्रपुरात मनपा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावे म्हणून सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रभागा-प्रभागात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. सकाळच्या वेळेत उमेदवारही चौकाचौकात जावून कॉर्नर सभा घेत मतदारांचा कौल आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकूणच सध्या शहरात सर्वत्र प्रचार सभांची धूम सुरू आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ६६ जागांकरिता एकूण ४६० उमेदवार रिंगणात आहेत. १७ प्रभागातून हे ६६ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. मनपा निवडणुकीसाठी १९ एप्रिलला मतदान तर २१ ला मतमोजणी होणार आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या उमेदवारांनी ७ एप्रिलपासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. सध्या सूर्य आग ओकत आहे. पारा ४३ अंशा पार गेला आहे. सकाळी ९ वाजतापासूनच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. दुपारी १२ वाजतानंतर तर घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी सकाळी ८ ते १२ हा वेळ प्रचारासाठी निवडला आहे. याच सकाळच्या वेळेत उमेदवार प्रभागात नागरिकांच्या घरी जाऊन भेटी घेताना दिसून येत आहे. प्रचारासाठी आता केवळ आठच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आता प्रचाराचा वेग वाढला आहे. सकाळच्या वेळेत उमेदवार आपल्या काही समर्थकांसह चौकाचौकात जावून मतदारांच्या भेटी घेत आहेत. तिथेच मग छोटेखानी कार्नर सभा घेत मतदारांचा कौल आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. उमेदवार कार्नर सभेत व्यस्त असताना उमेदवारांचे समर्थक दुसरीकडे मतदारांच्या घरी जावून डोअर टू डोअर प्रचार करीत आहेत.
दरम्यान, दुपारच्या सुमारास सुर्याच्या प्रकोपामुळे बाहेर फिरणे कठीण असल्यामुळे उमेदवार हा वेळ व्यर्थ न घालवता सोशल मीडीयावरून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे शहरातील गल्लीबोळासोबतच फेसबुक, व्हॉटसअॅपवरही चंद्रपूर मनपा निवडणुकीची धूम दिसून येत आहे. विद्यमान नगरसेवक तर केलेल्या कामाची यादीच व्हाटसअॅपवरून मतदारांच्या लक्षात आणून देत आहे. याशिवाय काही नगरसेवक बल्क मॅसेजचाही वापर करीत आहे. याव्यतिरिक्त सर्वांना एकाच वेळी भ्रमणध्वनी करून उमेदवारांच्या प्रचाराची एक विशिष्ट टेप ऐकविली जात आहे.
यासोबतच संध्याकाळी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भारिप बहुजन महासंघ आदी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा सुरू आहे. भाजपाकडून राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वत: प्रभागात जावून जाहीर सभा घेत आहेत. याशिवाय केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याही १२ एप्रिलपासून प्रभागांमध्ये जाहीर सभा होणार आहेत. शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख आ. बाळू धानोरकर, उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या प्रभागा-प्रभागात जाहीर सभा होत आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया, माजी आमदार सुभाष धोटे, आसावरी देवतळे, गजानन गावंडे हे प्रभागात फिरत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शशी देशकर,माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, हिराचंद बोरकुटे हे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करीत प्रभागात फिरत आहेत. (शहर प्रतिनिधी)
वरिष्ठ नेत्यांच्याही लवकरच सभा
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर हे दोन्ही नेते चंद्रपूरचे असल्याने त्यांनी भाजपा उमेदवारांसाठी प्रचार सभांचा तडाखा सुरू केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि काही वरिष्ठ नेत्यांच्याही लवकरच चंद्रपुरा सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, नागपूरचे आमदार प्रकाश गजभिये हे राकाँ उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन-चार दिवसात चंद्रपुरात येणार आहेत.