चंद्रपूर जिल्ह्यात हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या प्रशिक्षणाची फलश्रुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 02:00 PM2018-04-28T14:00:38+5:302018-04-28T14:00:47+5:30
बल्लारशहा येथील दादाभाई पाटरीज परिसरात सुरू असलेल्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे निवासी कौशल्य प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींकडून तयार झालेले ४० कॅरेट वजनाचे २५ लाख रुपये किंमत असलेले हिरे विक्री झाले आहेत.
वसंत खेडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाच्या कौशल्य उद्योजकता विकास अभियानांतर्गत बल्लारशहा येथील दादाभाई पाटरीज परिसरात सुरू असलेल्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे निवासी कौशल्य प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींकडून तयार झालेले ४० कॅरेट वजनाचे २५ लाख रुपये किंमत असलेले हिरे विक्री झाले आहेत. हे प्रशिक्षण सुरू होऊन अवघे दोन महिने झाले आहेत. एवढ्या कमी अवधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात हिरे विक्री होणे हे या प्रशिक्षणाचे मोठे यश म्हणावे लागेल. या प्रशिक्षण केंद्रात मुख्यत: ग्रामीण भागातील तरुण शिक्षण घेत आहेत. त्यांच्या हातून हिऱ्यांचे पैलू पाडले जात असल्याने हे यश अधिक महत्त्वाचे ठरते.
राज्यार्च अर्थ, वन आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने हे प्रशिक्षण केंद्र येथे सुरू झाले आहे. यात एकाच वेळेला पाचशे जणांना प्रशिक्षण दिले जात असून प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्यांचा (८०० तास) आहे. निवास व भोजनाची सोय असून ती मोफत आहे. १५ प्रशिक्षक असून हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या एकूण १०० मशीन्स आहेत. एका मशीनवर चार जण बसतील, अशी व्यवस्था आहे. मार्गदर्शनातून या कामाची माहिती तसेच प्रत्यक्ष काम असे या प्रशिक्षणाचे स्वरूप आहे. रोज सहा तास हे प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील या प्रकारचे हे पहिलेच आणि एकमेव प्रशिक्षण केंद्र आहे, अशी माहिती या केंद्राचे संचालक निलेश गुल्हाने यांनी ‘लोकमत’ला या केंद्राविषयी सांगताना माहिती दिली. ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, हे या केंद्राचे उद्देश आहे व येथून प्रशिक्षण घेऊन निघणाऱ्यांना नक्कीच सूरत-मुंबई इत्यादी ठिकाणी चांगल्या पगाराची नोकरी मिळणार, अशी हमी हे केंद्र देत आहे. प्रशिक्षणाकरिता येथे कच्चे हिरे बेल्जियम, इस्त्राईल, दक्षिण आफ्रिका या देशातून मागविले जातात. त्या ओबडधोबड हिऱ्यांना येथे प्रशिक्षणार्थीद्वारा कौशल्यपूर्ण, रेखीव पैलू पाडले जातात व त्यांना मग सूरत येथील मर्चेटाईन हाऊसला विक्रीकरिता पाठविले जातात. येथे पैलू पाडलेले २५ लाख किंमतीचे हिरे सूरतला विक्री झाले आहेत. सूरत व मुंबईला हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या कारागिरांची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत हिऱ्यांना पैलू पाडण्याचे निवासी कौशल्य प्रशिक्षण एन.डी. जेम्स प्रशिक्षण केंद्रामार्फत चालविले जात आहे. हे प्रशिक्षण घेण्याची आवड युवकांमध्ये आहे. म्हणूनच हे सत्र संपण्याआधीच पाचशे जागांकरिता एक हजार युवकांनी नाव नोंदणी केली आहे. त्यात ग्रामीण भागातील युवकांची संख्या अधिक आहे. हे प्रशिक्षण येथे तीन वर्षे चालणार असून या दरम्यान तीन हजार युवकांना प्रशिक्षित केले जाणार आहे, असे गुल्हाने यांनी सांगितले. या प्रशिक्षण केंद्राची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे.
वैशिष्टये
कच्च्या हिऱ्यांचा आकार एक मिलीमीटर एवढा लहान असते. त्यांना मोठ्या खुबीने व काळजीने पैलू पाडावे लागतात.
ग्रामीण युवकांमध्ये कौशल्य गुण व जिद्द आहे. त्यांना संधी मिळाल्यास गुणाचे चीज करतात, हे या प्रशिक्षणातून बघायला मिळते.
हे प्रशिक्षण महिलांनाही दिले जाणार आहे. तसा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
प्रशिक्षणाचे ८०० तास पूर्ण झाल्यानंतर परीक्षा घेऊन उत्तीर्णांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.