दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांना डायरिया
By admin | Published: April 13, 2015 01:52 AM2015-04-13T01:52:43+5:302015-04-13T01:52:43+5:30
येथून जवळ असलेल्या कारवा या गावातील माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दूषित पाण्यामुळे डायरियाची
एका विद्यार्थ्याचा मृत्यू : कारवा आश्रमशाळेतील संतापजनक प्रकार, २० विद्यार्थ्यांना लागण
बल्लारपूर : येथून जवळ असलेल्या कारवा या गावातील माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दूषित पाण्यामुळे डायरियाची लागण झाली आहे. एका विद्यार्थ्यांचा डायरियाने शनिवारी सायंकाळला मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्यांचे नाव गणेश रूस्तम शिंदे (१३) असून तो मूळचा सावा जि. हिंगोली येथील होता. तो या आश्रमशाळेत सहाव्या वर्गात शिकत होता. या खेरीज, याच आश्रमशाळेतील सुमारे २० विद्यार्थ्यांना हगवण आणि उलटी अशी डायरियासदृश आजाराची लागण झाल्याची माहिती आहे. या विद्यार्थ्यांना येथील ग्रामीण रुग्णालय व काही खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करून घेतल्याचे समजते.
सद्यस्थितीत या शाळेचे संतोष कन्नायासिंग राठोड, मनीष मदन मल्लोजी व मदिरा मदन मल्लोजी हे तीन विद्यार्थी हगवण व उलटी या त्रासाने बाधित असून ग्रामीण रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, मृत गणेश व त्याच्या सोबतचा त्याच आश्रमशाळेतील रामदास पांडुरंग गायकवाड या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती शुक्रवारी रात्रीच बिघडली. शनिवारी सकाळी या दोघांना आश्रमशाळेतील शिक्षकांनी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने रामदासची प्रकृती लवकर सुधारली. परंतु, गणेशच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाली नाही. डॉक्टरने त्याला परत एक दिवस उपचारार्थ दाखल राहण्याचा सल्ला दिला. परंतु, आपल्या गावाला जाण्याच्या घाईत त्याने डॉक्टरकडून सुटी मागून घेऊन हिंगोलीला जाणाऱ्या इतर आठ-दहा विद्यार्थ्यांसह तोही बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर गेला. तेथे त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने, रुग्णालयात आणत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. आज रविवारी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा मृत्यू डायरियाने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बल्लारपूर पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
कारवा येथील या आश्रमशाळेत पेयजल बोअरिंग आहे. ५-६ दिवसांपूर्वी या बोअरिंगमध्ये बिघाड झाल्याने जवळच्याच जुन्या बोअरिंगचे पाणी विद्यार्थ्यांना दिले जाऊ लागले आणि त्यानंतरच विद्यार्थ्यांना हगवण आणि उलटी होऊ लागली. अशा बाधित विद्यार्थ्यांना खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील बऱ्याच जणांची प्रकृती सुधारली. मात्र यातील तिघेजण अद्यापही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल आहेत. गणेशचा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाला की इतर कारणाने याचा उलगडा होईलच. डायरियामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अंदाजात दिसून येत असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कुंभारे यांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)
केंद्रीय मंत्र्यांनी घेतली दखल
या घटनेची माहिती खासदार व केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांना होताच त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुभाष कुंभारे यांच्याकडे याबाबत विचारणा केली. या शाळेतील बोअरिंग आणि विहिरीतील पाण्याचे नमूने तपासण्याचे आदेश दिले. त्यानुसार, डॉ. कुंभारे यांनी दुपारी आश्रमशाळेत जाऊन, पाण्याचे नमूने आणले व तपासाकरिता पाठविले आहे.
मुख्याध्यापक म्हणतात, पाणी दूषित नाही
या आश्रम शाळेतीतील तीन विद्यार्थी उलटी व हगवणीने बाधित होऊन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. गणेश सोबतच्या रामदास गायकवाडने येथील खासगी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतला. व तो बरा झाला. एवढे सारे स्पष्ट असूनही या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक केवळ त्याची प्रकृती बिघडली इतर कुणालाही काही झाले नाही असे सांगत आहेत. खुद्द डॉ. कुंभारे यांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी म्हणजे ३-४ दिवसांपूर्वी मलेरिया आणि डायरियाने पीडित विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली. त्यात कारवा येथीलही रुग्ण होते. असे असतानाही आम्ही ही तेच पाणी पीत असतो. इतर विद्यार्थीही तेच पाणी पितात. त्यामुळे, पाण्याचा हा दुष्परिणाम असे म्हणता येत नाही, असे मुख्याध्यापक सांगत आहे.
प्रकरणाची चौकशी व्हावी
कारवा येथील आश्रमशाळेत घडलेली ही घटना संतापजनक व तेवढीच गंभीर आहे. यात एका विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला आहे. मुख्याध्यापक पाणी दूषित नसल्याचे सांगत असले तरी २० विद्यार्थ्यांना डायरियाची लागण झाली आहे. या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे.