‘त्या’ वाघिणीच्या गळ्यातील फास नैसर्गिकरित्या निघाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:36 AM2021-06-09T04:36:18+5:302021-06-09T04:36:18+5:30
वरोरा : मागील १५ दिवसांपासून एक वाघीण गळ्यात फास घेऊन जंगलात फिरत आहे. तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी कॅमेरे लावले ...
वरोरा : मागील १५ दिवसांपासून एक वाघीण गळ्यात फास घेऊन जंगलात फिरत आहे. तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी कॅमेरे लावले आहेत. दरम्यान, ६ जूनरोजी सकाळी एक वाघीण कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. तिच्या गळ्यात फास दिसत नाही. त्यामुळे वाघिणीच्या गळ्यातील फास नैसर्गिकरित्या निघाल्याची शक्यता वनविभाग वर्तवित आहे.
वरोरा वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या सालोरी जंगलातील कक्ष क्रमांक १० मध्ये लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात गळ्यात फास असलेली वाघीण २३ मे रोजी आढळून आली. तिला शोधण्याकरिता वन अधिकारी व कर्मचारी सातत्याने गस्त घालीत होते. पगमार्ग आढळून येत होते, परंतु ती ६२ कॅमेऱ्यांना हुलकावणी देत होती. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात रानटी डुकराची शिकार त्या वाघिणीने केल्याचे मानले जात आहे. ६ जूनरोजी सकाळी ५:४५ वाजता कक्ष क्रमांक ११ मध्ये लावलेल्या कॅमेऱ्यात एक वाघीण कैद झाली; मात्र तिच्या गळ्यात फास दिसून येत नाही. त्यामुळे त्या वाघिणीच्या गळ्यातील फास नैसर्गिकरित्या निघाल्याची शक्यता वन विभाग वर्तवित आहे. या अनुषंगाने गळ्यात फास घेऊन फिरणारी वाघीण व कॅमेऱ्यात कैद झालेली वाघीण एकच आहे का, याबाबत वनविभाग परीक्षण करीत आहे.
कोट
६ जूनरोजी कॅमेऱ्यात कैद झालेल्या वाघिणीच्या अंगावरील पट्टे व पूर्वी असलेल्या वाघिणीच्या अंगावरील पट्टे तेच आहे का, याचा शोध घेणे सुरू आहे. त्या वाघावर देखरेख ठेवणे सुरू आहे.
-एन. आर. प्रवीण,
मुख्य वनसंरक्षक