७६ अंकाचा उच्चार 'शाहत्तर' की 'शहात्तर'? विद्यार्थ्यांचा होतोय गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 12:25 PM2022-01-05T12:25:16+5:302022-01-05T15:11:42+5:30
पहिल्या आणि तिसऱ्या वर्गातील गणिताच्या पुस्तकात अंकांच्या उच्चारांमध्ये बदल आहे. परिणामी पहिली आणि तिसऱ्या वर्गातील विद्यार्थी वेगवेगळे उच्चार करतात. यामुळे भविष्यात परीक्षेच्या वेळी, स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अडचण येण्याची शक्यता आहे.
साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : कोरोना संकटानंतर शाळा सुरू झाल्या. मात्र यावर्षी पहिली आणि तिसरीच्या गणिताच्या पुस्तकात काही अंकांचे उच्चार वेगवेगळे असल्याने विद्यार्थी गोंधळून जात आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालक शिक्षकांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. मात्र पुस्तकातच असल्याने शिक्षकांचाही नाईलाज होत आहे. यामध्ये भविष्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पहिली तसेच तिसरीच्या गणिताच्या पुस्तकातील काही अंकांचे उच्चार वेगवेगळे असल्याने नेमके कोणते उच्चार विद्यार्थ्यांना शिकवायचे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. पहिलीच्या पुस्तकात ५४ हा अंक अक्षरात चौपन्न असा लिहिला असून तिसरीच्या पुस्तकात तोच शब्द चोपन्न असा लिहिला आहे. पहिलीत ७६ चा शाहत्तर तर तिसरीच्या पुस्तकात शहात्तर असा उच्चार असल्याने गोंधळ होत आहे. यावर त्वरित तोडगा काढणे गरजेचे आहे.
प्रमाणिकृत लेखन कोणते?
दोन वर्गाच्या गणित विषयात अंकांचे वेगवेगळे उच्चार असल्यामुळे प्रमाणिकृत लेखन नेमके कोणते, हा प्रश्न सध्या शिक्षकांना पडला आहे. त्यामुळे पहिलीच्या विद्यार्थ्यांना पहिलीप्रमाणे तसेच तिसरीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकाप्रमाणे शिक्षक शिकवीत आहेत, मात्र विद्यार्थ्यांना चुकीचे शिकवत असल्याचा मनस्तापही अनेक शिक्षकांना होत आहे.
उच्चारातील फरक
अंक - पहिला वर्ग - तिसरा वर्ग
१९ - एकोणीस - एकोणवीस
५४ - चौपन्न - चोपन्न
७६ - शाहत्तर - शहात्तर
८५ - पंच्याऐंशी - पंचाऐंशी
८६ - शाऐंशी - शहाऐंशी
पहिल्या आणि तिसऱ्या वर्गातील गणिताच्या पुस्तकात अंकांच्या उच्चारांमध्ये बदल आहे. परिणामी पहिली आणि तिसऱ्या वर्गातील विद्यार्थी वेगवेगळे उच्चार करतात. यामुळे भविष्यात परीक्षेच्या वेळी, स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अडचण येण्याची शक्यता आहे. अंकांच्या उच्चारांमध्ये एकवाक्यता असायला हवी.
-जे. डी. पोटे, शिक्षण समिती सदस्य तथा मुख्याध्यापक, चंद्रपूर