पक्ष्यांच्या विविध प्रजाती नामशेष होताहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 10:16 PM2019-03-09T22:16:27+5:302019-03-09T22:16:54+5:30
नागरिकांची अनास्था, वाढती वृक्षतोड व कडक तीव्र उष्णतेचा विपरित परिणाम विविध पक्ष्यांवर होत असून अंदाजे ५० प्रजातीचे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षाच्या संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास लवकरच हे पक्षी नष्ट होतील, अशी भीती पक्षीतज्ज्ञांनी ‘लोकमत’जवळ बोलताना व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागरिकांची अनास्था, वाढती वृक्षतोड व कडक तीव्र उष्णतेचा विपरित परिणाम विविध पक्ष्यांवर होत असून अंदाजे ५० प्रजातीचे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षाच्या संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास लवकरच हे पक्षी नष्ट होतील, अशी भीती पक्षीतज्ज्ञांनी ‘लोकमत’जवळ बोलताना व्यक्त केली.
अतिसंवेदनशील वर्गात मोडणाऱ्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिक व पक्षी मित्राच्या सहाय्याने वनविभागाने जनजागृती करून विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे. कुठले पक्षी घराच्या आश्रयाला आले तर मुठभर धान्य टाका. त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. विविध पक्षाच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्या. त्यांनाही मनुष्याच्या मदतीची गरज आहे. वाढत्या वृक्षतोडीमुळे त्याचा परिणाम एकंदरीत ऋतु चक्रावर होत आहे.
कडक उन्हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्याचा परिणाम पक्ष्याच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. सामान्यत: सिंदेवाहीत कावळे, गिधाड, खार, घुबड, लाल पंख असलेले कावळे, मैना, घोरपड, रानकोंबडे, पोपट, देवपक्षी, कवडी, लावे, तितीर, पिंजरा, सुतार पक्षी, कोकीळ, सारस, सुगरण, पान बुडी, ढोकरी, सातभाई, सहाढोक सूर्यपक्षी हे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
मार्च ते जुलै विणीचा काळ
साधारणपणे मार्च ते जुलै या महिन्यात पक्ष्यांचा विणीचा काळ असतो. मात्र निसर्गातील बदल यामुळे पक्ष्यांची प्रसव प्रक्रिया प्रभावित होत असल्याने प्रजननावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निसर्गाचा सफाई कामगार समजला जाणारा गिधाड हा पक्षी दिसेनासा होत चालला आहे. मांसाहारी अन्न मिळण्यात अडथळा, शिकार, विषप्रयोगामुळे तसेच पाण्याअभावी त्यांची संख्या रोडावली आहे. म्हातारी जनावरे विकल्या जात असल्यामुळे पक्ष्यांना मास मिळेनासे झाले आहे. ग्लोबल वार्मींगसोबत वाढते शहरीकरणही या पक्ष्यांच्या मुळावर घाला घालत आहेत.
प्राणी-पक्ष्यांसाठी पाणी ठेवा
माणूस आपली तहान कशाही प्रकारे भागवत असला तरी प्राणी-पक्ष्यांना मात्र यासाठी जीवाचे रान करावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी अंगणात सावलीमध्ये पाणी ठेवण्याचे आवाहन पक्षी मित्रांकडून करण्यात येत आहे. काही पक्षिमित्र दरवर्षी पाण्याची मातीची भांडी आणि पक्ष्यांसाठी घरट्याचे वितरण करीत आहेत. पेटगाव येथील पक्षिमित्र तथा शिक्षक पुंडलिक बावणे हे दरवर्षी शाळेच्या मैदानावरील झाडावर पक्ष्यांचे घरटे ठेवतात. त्यामध्ये पक्ष्यांना राहण्यासाठी व पाण्याची व्यवस्था केली जाते. पाणी संपले की ते घरट्यामध्ये पाणी टाकतात. त्यामुळे झाडावर विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात.
मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, जंगलात मानवाचा वाढता वावर, तलावाचे सौंदर्यीकरण आदी प्रकारामुळे पक्ष्यांची काही प्रजाती कमी होत आहेत. पूर्वी घरात चिमण्यांची घरटी असायची. आता घरांचे रुप बदलले आहे. त्यामुळे चिमण्यांची घरटी दिसत नाही. जलाशयाजवळ असणाऱ्या पक्ष्यांचीही संख्या आता कमी होत आहे.
- प्रकाश कामडे,
पक्षीमित्र, चंद्रपूर.