जीवनाभिमुख शिबिरातून मिळाली दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:03 PM2018-05-23T23:03:54+5:302018-05-23T23:03:54+5:30
श्री गुरूदेव आत्मानुसंधान अड्याळ टेकडीवर दरवर्षी जीवन शिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा ५ ते २० मे या कालावधीत पार पडलेल्या शिबिरात १४२ शिबिरार्थ्यांनी सहभाग घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : श्री गुरूदेव आत्मानुसंधान अड्याळ टेकडीवर दरवर्षी जीवन शिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा ५ ते २० मे या कालावधीत पार पडलेल्या शिबिरात १४२ शिबिरार्थ्यांनी सहभाग घेतला.
अड्याळ टेकडीचे उत्तराधिकारी सुबोध दादा यांच्या मार्गदर्शनाखाली १५ दिवस चाललेल्या जीवनशिक्षण शिबिरात अध्ययन, व्यायाम व उद्योग आदी विषयांचे जीवनोपयोगी धडे देण्यात आले. ध्यान, भजन, ग्रामगीता अध्ययन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गीताचार्य तुकाराम दादा यांचा जीवन परिचय, श्रमदान, आदर्श दिनचर्या, आहारशास्त्र, निसर्गोपचार आणि आयुर्वेद, योगा, क्रीडा व लघुउद्योगांची माहिती देण्यात आली. मंजन, अमृतधारा, आसन पत्रावळी बनविणे, चटई, धुपबत्ती, चरखा , कपडा विनाई आदी विविध विविध विषय प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आले. सुबोधदादा, वा.ग.वैद्य गुरूजी , लोकेश मुळे, रेखा बुराडे, गंगाबाई काकडे, लक्ष्मी गुरूनुले, विलास सावरकर, अनिल गुडधे, सुनील राठोड, सुनील पाथोडे, रत्नाकर मेश्राम, दयाराम कुत्तरमारे आदींनी विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान दिले.
अड्याळ टेकडीवरील जीवन शिक्षण शिबिरात केवळ परिसरातीलच नव्हे तर विदर्भातील बहुतेक जिल्ह्याचे विद्यार्थी सहभागी झाले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गीताचार्य तुकाराम दादा यांच्या सहवासाने पावन झालेल्या अड्याळ टेकडीच्या निसर्गरम्य वातावरणात हे शिक्षण शिबिर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला वा. ग. वैद्य, शिवदास कुंभारे, शेंद्रे, प्रमोद माळवे, लालचंद नखाते,फाल्गुन राऊत, बन्सोड, आंबटकर गुरूजी, जगदीश वैद्य, मंजुळा काकडे आदी उपस्थित होते. यावेळी शिबिरार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचारांनुसार आदर्श समाज घडविण्यासाठी टेकडीवर विविध उपक्रम वर्षभर आयोजित करण्याची परंपरा यापुढेही सुरू राहणार आहे.