जलवाहिनीतील व्हॉल्वच्या टाक्यात घाणीचे साम्राज्य
By admin | Published: July 12, 2015 01:17 AM2015-07-12T01:17:58+5:302015-07-12T01:17:58+5:30
इरई धरणातून चंद्रपूर शहराच्या जलशुद्धीकरण केंद्राला जलवाहिनीद्वारे पाण्याचा पुरवठा होतो. वीज केंद्राच्या मेजर गेटपुढे यावर बसविलेल्या एका व्हॉल्वचे टाके उघड्यावर पडले आहे.
पाणी दूषित: अनेक दिवसांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष
दुर्गापूर : इरई धरणातून चंद्रपूर शहराच्या जलशुद्धीकरण केंद्राला जलवाहिनीद्वारे पाण्याचा पुरवठा होतो. वीज केंद्राच्या मेजर गेटपुढे यावर बसविलेल्या एका व्हॉल्वचे टाके उघड्यावर पडले आहे. यात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाण्याचा पुरवठा केल्या जात आहे. धरणातून पाणी आणण्यासाठी तुकूमस्थित जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत एक मोठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. यावर ठिकठिकणी एअर व्हॉल्व्ह शिवाय मुख्य व्हॉल्व बसविले आहेत. त्या सभोवताल सिमेंट क्राँक्रीटच्या टाक्याचे बांधकाम करण्यात आले आहे. असाच एक व्हॉल्व चंद्रपूर-ताडोबा मार्गावर वीज केंद्राच्या मेजर गेट पुढे आहे. याचे बांधकाम करण्यात आले. तेव्हा टाके बंद अवस्थेत होते. मात्र सध्या हे टाके उघड्यावर पडले आहे. यावरील झाकण चोरट्यांनी लंपास केले आहे. यामुळे या टाक्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात राहणारे नागरिक, व्यावसायिक कचराकुंडीसारखे याच व्हॉल्वमध्ये केरकचरा फेकत आहेत. या टाक्यातील घाण पाणी व्हॉल्वद्वारे जलवाहिनीत शिरुन पाणी दूषित होत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)