देवाडा परिसरात नागरिक आधारकार्डपासून वंचित
By admin | Published: July 17, 2015 12:53 AM2015-07-17T00:53:55+5:302015-07-17T00:53:55+5:30
राजुरा तालुक्यातील देवाडा परिसरातील नागरिक आधारकार्डपासून वंचित आहेत. मागील अनेक वर्षांपासून नागरिकांनी आधारकार्ड काढले नसल्यामुळे व....
देवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडा परिसरातील नागरिक आधारकार्डपासून वंचित आहेत. मागील अनेक वर्षांपासून नागरिकांनी आधारकार्ड काढले नसल्यामुळे व अनेकांना अजूनही आधार कार्डविषयी माहितीच नसल्यामुळे शासनाच्या कार्यात अडथळा येत असून शासकीय योजनेपासून लाभार्थ्यांना वंचित रहावे लागत आहे.
शासनाच्या विविध योजना व सवलतीचा लाभ घेण्याकरिता तथा शासकीय कामाकरिता विविध आवेदनपत्रे भरताना ओळखपत्र म्हणून आधारकार्डची मागणी वाढलेली आहे. परंतु त्यातील छायाचित्राच्या सदोषतेमुळे आता आधारकार्डच निराधार ठरत आहे. शासनाच्या विविध योजना व नवनवीन सवलतीकरिता अनेकदा ओळखपत्र म्हणून आधारकार्डची मागणी केली जाते. आधारकार्डावरील पत्ता व छायाचित्र ग्राहय धरून संबंधितांना लाभ मिळविता येतो. नागरिकांना मिळालेल्या आधार कार्डावर काढलेले छायाचित्रच अस्पष्ट व धुसर असल्याने सत्यप्रतित फोटोत छायाचित्र दिसत नाही.
कार्यालयात कागदोपत्रांची पुर्तता करताना आधारकार्डवरील धुसर छायाचित्र नागरिकांकरिता अडचणीचे ठरत आहे. अनेकदा हे आधारकार्डच डोकेदुखी ठरत आहे. शासनाकडून प्राप्त झालेले हे आधारकार्ड सदोष असल्याने एकतर ते बदलवून घ्यावेत किंवा नविन आधारकार्ड काढावे. जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही, अशी मागणी त्रस्त आधारकार्डधारक करीत आहेत. आधारकार्डावरील छायाचित्रांबाबत नागरिकांच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असल्याने शासनाने विशेष मोहीम राबवून नवे आधारकार्ड काढावे व जुन्याच आधारकार्डातील फोटो स्पष्ट दिसतील असे तांत्रिक बदल करून घ्यावेत, अशी मागणी आहे.
मोठा गाजावाजा करून आधारकार्डची योजना अंमलात आणण्यात आली. मात्र त्याची डोकेदुखी देवाडा परिसरातील नागरिकांना होत आहे. (वार्ताहर)