प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित
By admin | Published: May 13, 2017 12:35 AM2017-05-13T00:35:55+5:302017-05-13T00:35:55+5:30
स्थानिक माजरी येथील नागलोन खुली कोळसा खदान २ मध्ये पाटाळा, नागलोन, पऴसगाव व शिवजीनगर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या.
आजपासून आंदोलन : नागलोन कोळसा खाण शेतजमीनप्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी: स्थानिक माजरी येथील नागलोन खुली कोळसा खदान २ मध्ये पाटाळा, नागलोन, पऴसगाव व शिवजीनगर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र अद्यापही या शेतकऱ्यांना आश्वासनाप्रमाणे नोकरी देण्यात आली नाही. त्यामुळे १३ मेपासून प्रकल्पग्रस्तांनी सहकुटुंब खाण काम बंद आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनादरम्यान, प्रकल्पग्रस्त कुटुंबीय खाण परिसरातच तळ ठोकून राहणार आहेत. मागील दहा दिवसांपूर्वी असेच आंदोलन करण्यात आले होते. यावेळी वेकोलिचे १६५ हजार टन कोळसा उत्पादन ठप्प झाले होते. यात ५० कोटी रुपयांचा वेकोलिला फटका बसला होता. वेकोलि प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागणीवर कोणताही निर्णय घेतला नाही. मागील आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी यांनी नागपूर येथील वेकोलिचे अधिकारी घोष व परांजपे, वेकोलि माजरीचे महाप्रबंधक सत्येन्द्र पांडे, पोलीस उपअधिक्षक राजपुत, उपविभागीय अधिकारी, वरोऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी, माजरीचे ठाणेदार कृष्णा तिवारी, प्रहार संघटनेचे गजानन कुबडे, अमोल डुकरे, आणि प्रकल्पग्रस्तांची बैठक बोलाविली. ३० एप्रिल २०१७ पर्यंत सर्वच प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे लिखित आश्वासन दिले होते. त्यानंतर २८ जणांना नोकरीचे आदेश देण्यात आले होते. न्यायालयात प्रलंबित व अल्पवयीन यांना वगळता सर्वांनाच नोकरी देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी चालू असलेले आंदोलन ३० एप्रिलपासून तात्पुरते स्थगित केले होते. परंतु नोकरी न दिल्यास आणखी काम बंद आंदोलन करु, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला होता. या काम बंद आंदोलनात प्रकल्पग्रस्त निलेश ढवस, संदिप झाड़े, रवी उपरे, अंकुश डंभारे, गोकुल डोंगे, किसन ढवस, प्रफुल भुसारी, गजानन पारशिवे, संगिता खापणे, माया ढवस, मिराबाई ढवस यांनी सहकुटुंब काम बंद आंदोलन सुरू केले. आश्वासनानंतरही ७८ प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेश न दिल्याने पुन्हा १३ मेपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.