आॅटोरिक्षाअभावी गैरसोय
By admin | Published: January 22, 2017 12:47 AM2017-01-22T00:47:06+5:302017-01-22T00:47:06+5:30
आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आॅटोरिक्षाचालकांनी शनिवारी बंद पुकारला. यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
धरणेही दिले : आॅटोरिक्षाचालकांचा कडकडीत बंद
चंद्रपूर : आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आॅटोरिक्षाचालकांनी शनिवारी बंद पुकारला. यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान, शहरात शनिवारी आॅटोच न धावल्याने नागरिकांची व बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. अनेकांना पाठीवर ओझे घेऊनच आपले इप्सित स्थळ गाठावे लागले.
केंद्र व राज्य शासनाने नव्याने आॅटोरिक्षा चालकावर फिटनेस फाईन, ट्रान्सफर फाईन, लायसन रिनीवल फाईन व अनेक प्रकारच्या फाईनमध्ये वाढ केली आहे. शासनाचा हा निर्णय आॅटोरिक्षा चालकाच्या फाटक्या खिशात हात घालणारा आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात व काही प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील आॅटोरिक्षा चालकांनी महाराष्ट्र आॅटोचालक मालक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यासोबतच आॅटोरिक्षाचालकांनी आज बंदही पुकारला होता. या बंदमुळे चंद्रपुरात एकही आॅटो शहरात धावला नाही. त्यामुळे विविध कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची व बाहेरून चंद्रपुरात आलेल्या प्रवाशांची चांगली गैरसोय झाली. अनेकजण हातात लगेज घेऊन पायदळच रस्त्यावरून जाताना दिसत होते. दरम्यान, धरणे आंदोलनात ग्रामीण आॅटो संघटनेचे अध्यक्ष बाळू उपलंचीवार, मोक्षवीर लोहकरे, बळीराम शिंदे, मधुकर राऊत, बंडी मालेकर, दीपक दादगये, दीपक झाडे व असंख्य आॅटोरिक्षा चालक मालक सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)