परवानगी न घेणारे मंडळ धर्मदायच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 06:00 AM2019-08-24T06:00:00+5:302019-08-24T06:00:28+5:30
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश तसेच इतर सार्वजनिक साजरा केला जातो. अनेकवेळा सामान्य नागरिकांकडून वर्गणी गोळा केली जाते. मात्र अनेकवेळा काही मंडळ धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची परवानगीच घेत नाही. गणेश उत्सव काही दिवसांवर आला आहे.
साईनाथ कुचनकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे गल्लीबोळातील लहान मोठ्या मंडळांनी पावती बुक छापून लाखो रुपयांची वर्गणी गोळा करणे सुरू केले आहे. मात्र हे करताना धर्मदाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणे काही सार्वजनिक मंडळे विसरली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील सदर मंडळ धर्मदाय आयुक्त कार्र्यालयाच्या रडारवर असून त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेश मंडळ असतानाही आतापर्यंत केवळ ३८ मंडळांनीच वर्गणी गोळा करण्यासंदर्भात धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून परवानगी घेतली आहे. वर्गणी देण्यापूर्वी सार्वजनिक मंडळांच्या सदस्यांना परवागी संदर्भात विचारणा करूनच वर्गणी देणे गरजेचे आहे. आपण दिलेली वर्गणी योग्य कामासाठी वापरली जाते की, अन्य कामाला. हे सुद्धा बघणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी जागरुक राहून आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे.
हिशेब देण्यास टाळाटाळ
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश तसेच इतर सार्वजनिक साजरा केला जातो. अनेकवेळा सामान्य नागरिकांकडून वर्गणी गोळा केली जाते. मात्र अनेकवेळा काही मंडळ धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची परवानगीच घेत नाही. गणेश उत्सव काही दिवसांवर आला आहे. मंडळांनी मोठ्या प्रमाणात पावती बुक छापून वर्गणी गोळा करणे सुरू केले आहे. एखाद्याने परवानगी तसेच हिशेबाचा विषय काढलाच तर वार्डातील काम आहे, उत्सवानंतर हिशेब दिल्या जाईल, असे उत्तर देऊन मंडळाचे सदस्य वेळ मारून नेत आहेत. काही गणेश मंडळाचे सदस्य हिशेब मागणाऱ्यांकडे जाण्याचे कटाक्षाने टाळत आहे.
तक्रार केल्यास होणार कारवाई
एखाद्या मंडळाने गोळा केलेल्या रकमेचा अपहार केला किंवा हिशेब देत नसेल, मंडळाच्या उद्देशालाच जर हरताळ फासला जात असेल तर मंडळावर कारवाई केली जाऊ शकते. मात्र यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० च्या कलम ६६ (क)प्रमाणे तीन महिन्यांची कैद किंवा परवागीशिवाय गोळा केलेल्या रकमेच्या एकूण वर्गणीच्या दीडपट दंड संबंधित मंडळाकडून आकारण्यात येणार आहे.
अशी घ्या परवानगी
वॉर्डात किंवा गावात सार्वजनिक गणेशोत्सव तथा इतर उत्सव साजरा करायचा असेल तर धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून वर्गणी गोळा करण्याची परवानगी घेणे आवश्यक आहे . यासाठी सात किंवा त्यापेक्षा अधिक सदस्यांनी मिळून ठराव घेणे गरजेचे आहे. या सदस्यांचे ओळखपत्र, आधारकार्ड, ज्या जागेवर स्थापना करावयाची आहे, त्या जागा मालकांची परवानगी पत्र, वीज मंडळाचे नाहरकत पत्र, किंवा छोट्या मंडळांसाठी ज्या घरमालकांकडून वीज घेण्यात आली आहे. त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र, वीजबिल आदी कागदपत्र गोळा करून, १०० रुपयांच्या स्टँपपेपरवर उत्सवासंदर्भात उद्देश लिहावा. त्यानंतर धर्मदाय आयुक्त कार्यालयामधून पाच रुपयांचा अर्ज घेऊन या अर्जातील माहिती भरून आॅफलाईन किंवा आॅनलाईन अर्ज सादर केल्यास १५ दिवसांत परवानगी मिळेल.
ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज भरण्याची सुुविधा
धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून देणगी गोळा करण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज भरता येतो. अर्ज सादर केल्यानंतर किमान १० ते १५ दिवसांमध्ये मंडळांना परवानगी मिळतात.
दान-देणगीसाठीच परवानगी
धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून कोणताही उत्सव साजरा करण्यासाठी नाही तर दान-देणगी गोळा करण्याची परवानगी दिल्या जाते. त्यामुळे केवळ या कार्यालयाकडून परवानगी मिळाली म्हणजे, सार्वजनिक उत्सव साजरा करू शकतो, असा गैरसमज मंडळांनी दूर करणे गरजेचे आहे.
सार्वजनिक मंडळांची जबाबदारी
सार्वजनिक मंडळाने उत्सवादरम्यान धर्मदाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेतल्यानंतर त्या परवानगीची माहिती दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे. मात्र अनेक गणेश मंडळ याकडे दुर्लक्ष करतात.
जनजागृतीसाठी पोलीस अधीक्षकांचे पत्र
जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मात्र काही मंडळ कोणतीही परवानही न घेता उत्सव साजरा करतात. अनेकवेळा मोठ्या प्रमाणात वर्गणीसुद्धा गोळा करताता. त्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करावा, असे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाला दिले आहे.
पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही मंडळाने वर्गणी गोळा करू नये. काही मंडळांना भेटी देण्यात येणार असून यामध्ये गैरप्रकार आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल.
- सी. एम. ढबाले
सहाय्यक धर्मदाय आयुक्त,चंद्रपूर
दोन महिन्यांत द्यावा लागेल हिशेब
सार्वजनिक मंडळांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून वर्गणी गोळा करण्यासंदभात परवानगी घेतल्यानंतर या कार्यालयाला दोन महिन्यांच्या आत लेखा परीक्षण अहवाल सादर करावा लागणार आहे. तसेच उत्सवानंतर शिल्लक राहिलेली रक्कम जमा करणे अनिवार्य आहे.
परवानगी घेण्यासाठी अत्यल्प प्रतिसाद
मागील वर्षी गणेश तसेच शारदोत्सवामध्ये जिल्ह्यात तब्बल बाराशेंच्यावर मंडळांनी वर्गणी गोळा करण्यासाठी परवागी घेतली होती. यावर्षी मात्र अल्प प्रतिसाद असून केवळ ३८ अर्जच कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे. यामध्ये ३० ऑनलाईन आणि ८ ऑफलाईन अर्ज करण्यात आले.
परवानगी केवळ सहा महिन्यांसाठी
उत्सावासाठी गोळा करण्यात येणाºया वर्गणीसाठी ४१(क) अंतर्गत तात्पुती परवानगी देण्यात येत असून ही परवानगी सहा महिन्यांच्या कालावधीची राहते. सहा महिन्यानंतर ही परवानगी वैद्य राहात नाही. एवढेच नाही तर परवानगी घेतल्यानंतर नुतनीकरणही होत नाही.
पूरग्रस्तांना करावी मदत
यावर्षी सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये महापूर आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवीत तसेच आर्थिक नुकसान झाले. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. या पूरग्रस्तांना सावरण्यासाठी सर्वस्तरावरून मदत पाठविली जात आहे. सार्वजनिक मंडळांनीही जबाबदारी स्वीकारून उत्सव साजरा करण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी म्हणून पूरग्रस्तांना मदत केल्यास खºया अर्थाने सार्वजनिक मंडळाचे काम सर्वसामान्यांपर्यंत पोहचेल.