एसडीआरएफच्या प्रशिक्षण कार्यशाळेत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:07+5:302021-06-17T04:20:07+5:30
चंद्रपूर : पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थती लक्षात घेता नागरिकांचा बचाव करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या दृष्टीने नागपूर येथील राज्य ...
चंद्रपूर : पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थती लक्षात घेता नागरिकांचा बचाव करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या दृष्टीने नागपूर येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्यावतीने (एसडीआरएफ) प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत पूर परिस्थिती संदर्भात धडे देण्यात आले.
नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यशाळेत निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, एसडीआरएफचे पोलीस उपअधीक्षक सुरेश कराळे, पोलीस उपनिरीक्षक अजय काळसरपे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गव्हाड म्हणाले, जिल्ह्यातील जवळपास ८६ गावे पूरप्रवण क्षेत्रात असून, पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रात्यक्षिक महत्त्वाचे आहे. या प्रशिक्षणातील माहिती आपापल्या तालुक्यातील इतरांना देण्यासाठी अतिशय गांभीर्याने प्रशिक्षण शिकून घ्या. तसेच ज्या गावांमध्ये पूर परिस्थिती येण्याची शक्यता असते तेथील किमान १० ते १५ नागरिकांचे संपर्क क्रमांक जवळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे नेटवर्कची समस्या उद्भवणार नाही. पूर परिस्थितीत नागरिकांचे जीव वाचविणे आणि त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी टीमवर्क म्हणून काम करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
एसडीआरएफचे उपअधीक्षक कराळे म्हणाले, पूर परिस्थितीत नागरिक घाबरलेले असतात. त्यामुळे त्यांना धीर देणे आवश्यक आहे. आम्ही तुमच्या मदतीला आलो आहोत, असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करा. पूरपीडित गावातील सरपंच, पोलीसपाटील व इतरही नागरिकांना सोबत घेऊन मदतकार्य सुरू करावे, जेणेकरून स्थानिक परिस्थितीची त्यांना चांगली कल्पना असल्यामुळे मदतकार्यात अडचण निर्माण होणार नाही. संपर्क यंत्रणा मजबूत असणे गरजेचे आहे. एखाद्याने मदतीची याचना केली तर कोणताही विलंब न करता त्या परिस्थितीतून संबंधितांना बाहेर काढणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूरपरिस्थिती हाताळताना मास्कचा वापर, सॅनिटायझर आदींचा उपयोग करावा. आपत्कालीन किटमध्ये टार्च, बॅटरीवर चालणारे वॉकीटॉकी, खाद्यसामुग्री, प्रथमोपचार किट आदी बाबी सोबत असाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी इको - प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्यासह पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी तसेच तालुका स्तरावरील आपत्ती व्यवस्थापनांतर्गत काम करणाऱ्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.