शिवशाही एसी स्लीपर बसच्या तिकीट दरात सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:37 PM2019-02-09T22:37:54+5:302019-02-09T22:38:22+5:30
राज्यातील खासगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासाठी एसटीने एसी स्लीपर शिवशाही बसेस सुरू केल्या. परंतु, जास्त तिकीट दरामुळे प्रवाशांनी शिवशाहीकडे पाठ फिरवली. परिणामी प्रवाशांना शिवशाहीकडे आकर्षित करण्यासाठी तिकीट दर कमी करण्यात आलेले आहेत. १५.२० रुपये प्रति टप्प्यावरुन ११.३५ रुपये प्रति टप्पा करण्यात आला असून ही दरकपात १३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यातील खासगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासाठी एसटीने एसी स्लीपर शिवशाही बसेस सुरू केल्या. परंतु, जास्त तिकीट दरामुळे प्रवाशांनी शिवशाहीकडे पाठ फिरवली. परिणामी प्रवाशांना शिवशाहीकडे आकर्षित करण्यासाठी तिकीट दर कमी करण्यात आलेले आहेत. १५.२० रुपये प्रति टप्प्यावरुन ११.३५ रुपये प्रति टप्पा करण्यात आला असून ही दरकपात १३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.
राज्यातील खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत स्लीपर एसी शिवशाहीचे तिकीट जास्त असल्यामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरविली होती. चंद्रपूर डेपोवरुन औरंगाबादकरिता शिवशाही एसी स्लीपर कोच बस धावते. पूर्वी मंडळाकडून प्रति सहा किलोमिटरचा एक टप्पा १५.२० पैसे आकारण्यात येत होता. त्यामुळे चंद्रपूरवरुन औरंगाबादकडे धावणाऱ्या शिवशाही एसी स्लिपरची तिकीट १६७० रुपये होती. मात्र आता यामध्ये कपात करुन प्रति टप्पा ११.३५ पैसे आकारण्यात येणार असल्याने औरंगाबादकरिता १२५० रुपये प्रवास भाडे पडणार आहे. तर पूर्वी जालणा १४९५ आता ११०५, खामगाव ११३० आता ८३५, अकोला ९९०-७२५, अमरावती ७३५-५३५, वर्धा ४१५-३१० रुपये प्रवास भाडे कमी करण्यात आले आहे.
एसी शिवशाही स्लीपर बसमध्ये जेष्ठ नागरिकांना तिकीट दरामध्ये ३० टक्के सवलत यापूर्वीच देण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट दरातील कपातीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांच्या बरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही होणार असल्यामुळे प्रवाशांनी सुरक्षित, आरामदायी व शयनयान प्रवासासाठी एसटीच्या एसी शिवशाही शयनयान बसचा वापर करावा, असे आवाहन चंद्रपूर एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक सचिन डफळे व सहाय्यक वाहतूक निरिक्षक नागपूरे यांनी केले आहे.
सिटींग बसचे प्रवासदर कमी करा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १३ फेब्रुवारीपासून एसटीच्या शिवशाहीच्या एसी स्लीपर बसची तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शिवशाही सिटींग बसचे दर अजूनही कमी केले नाही. चंद्रपुरातून नागपूरसाठी अनेक शिवशाही सिटींग बस धावातात. मात्र या बसची तिकिट २९० रुपये आकारण्यात येत असल्याने प्रवाश्यांनी या बसकडे पाठ फिरवली आहे. याउलट खासगी एसी टॅव्हल्स केवळ २०० रुपये दर आकारते. परिणामी प्रवासी खासगी वाहनाचा वापर करतात. त्यामुळे शिवशाही सिटींग बसचे दर कमी करावे, अशी मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे.