बांबूला वाहतूक परवान्यातून सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:29 PM2018-10-27T22:29:33+5:302018-10-27T22:30:52+5:30
बुरूड समाजाचे आणि वनविभागाचे एक अतूट असे नाते आहे. बांबु हा दोन्ही घटकांना जोडणारा समान धागा आहे. बांबु क्षेत्रात वनविभागाने गेल्या चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बुरूड समाजाचे आणि वनविभागाचे एक अतूट असे नाते आहे. बांबु हा दोन्ही घटकांना जोडणारा समान धागा आहे. बांबु क्षेत्रात वनविभागाने गेल्या चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे. सन २०१७ च्या भारतीय वनस्थिती अहवालानुसार २०१५ च्या तुलनेत राज्यातील बांबु प्रवण क्षेत्रात ४४६५ चौ.कि.मी. इतकी भरीव वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली येथे बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. बांबु क्षेत्राचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने स्वतंत्र महाराष्ट्र बांबु विकास मंडळ स्थापन करण्यात आले आहे. बांबुच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला आपण प्राधान्य दिले असून बांबु हॅन्डीक्राफ्ट व आर्ट युनिट आपण स्थापन केले आहेत. बांबुला वाहतूक परवान्यातून सूट देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. हा निर्णय आता देश पातळीवरसुध्दा घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, वनेमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपुरात विदर्भ बुरूड समाज संघटनेद्वारे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, बांबु धोरणाअंतर्गत बुरूड समाज बांधवांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपण लवकरच एक बैठक घेवून योग्य दिशा निश्चित करू. बुरूड समाज नेहमीच सात्विक आणि प्रामाणिक राहिला आहे. बांबुच्या माध्यमातून उपजिविका करणाऱ्या या समाजाने नेहमीच नवनिर्मितीचा ध्यास घेतला आहे. नविन बुरुडांना वन विभागाकडे नोंदणी करण्यास मान्यता देत बुरुड समाजातील बांबू कारागीरांना पुरवठा करण्यात येणाऱ्या बांबुवरील स्वामित्वशुल्कात सूट प्रदान करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. बांबुपासून रोजगार निर्मितीच्या शासनाच्या धोरणाला अनुसरून बुरूड समाज बांधवांना योग्य प्रशिक्षण देण्यास शासन तयार आहे. त्या दृष्टीने समाज बांधवांनी आपली मानसिकता तयार करण्याची आवश्यकता आहे. बुरूड समाज बांधवांनी या दृष्टीने त्यांच्या संकल्पना सादर कराव्या, शासन पूर्णपणे त्यांना सहकार्य करण्यास तयार असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी आ. नाना श्यामकुळे म्हणाले, राज्य शासनाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात बांबु क्षेत्रासाठी अभुतपूर्व असे निर्णय घेतले आहे. सामाजिक जाणीव लाभलेला असा नेता पाठिशी असताना बुरूड समाज बांधवांना चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही, असे सांगितले. यावेळी बुरूड समाजाचे नेते किशोर जोरगेवार यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी आ. प्रा. अनिल सोले, माजी नगराध्यक्ष प्रभाकर पटकोटवार, व्यंकट रामलू, कैलाश पदमगिरीवार, स्वाती वडपल्लीवार, अनुराधा पल्लडवार, बंडू गैनेवार, दिपांजली मंथनवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.