शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत शिक्षक संघाची सीईओंसोबत चर्चा
By admin | Published: February 10, 2017 12:48 AM2017-02-10T00:48:49+5:302017-02-10T00:48:49+5:30
मयत झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांची जिल्हा परिषद प्रशासनाने एक प्रकारे थट्टा चालविली
संजय झोले : मयत शिक्षकांच्या कुटुंबीयांचे दावे प्राधान्याने काढणार
चंद्रपूर : मयत झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांची जिल्हा परिषद प्रशासनाने एक प्रकारे थट्टा चालविली असल्याचा आरोप करीत दोन वर्षाचा कालावधी लोटूनही कुटुंबीयांना भविष्य निर्वाह निधी, गटविमा , बचतनिधी विमा, सेवानिवृत्ती उपदान, कुटुंब निवृत्ती वेतन आदी क्लेम मिळाले नाही. त्यामुळे म.रा. प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखेने नाराजी व्यक्त करीत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) संजय झोले, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राम गारकर यांची भेट घेऊन मृत शिक्षक ओमप्रकाश शेंडे आणि विलास गंगाधर रामटेके यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली.
यावेळी शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी विलास लखदिवे व शरद रामटेके यांना तात्काळ बोलावून सदर प्रकरणाकडे लक्ष देण्याविषयी सांगितले व सदर शिक्षकांचे क्लेम निकाली काढण्याची हमी दिली.
दरम्यान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्य जे.डी. पोटे, सचिव किशोर उरकुंडवार यांनी ओमप्रकाश शेंडे याच्या निधनाला दोन वर्षे पूर्ण झालेली असून सुद्धा एकही क्लेम मिळाले नसल्याने त्यांनी पंचायत समिती पोंभूर्णाच्या शिक्षण विभागाने सदर प्रकरण गांभिर्याने घेत नसल्याचा आरोप केला. पोंभूर्णा पंचायत समितीमधील संबंतिधांवर कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनातून केली. चर्चेच्या वेळी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर तर संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष जे.डी. पोटे, सरचिटणीस किशोर उरकुंडवार, उपाध्यक्ष बाबासाहेब नागरे, भक्तदास कांबळे यांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)