सेवापुस्तकांच्या पडताळणीबाबत सीईओंशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:21+5:302021-06-18T04:20:21+5:30
मूल : शिक्षकांच्या सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार करण्यात आलेल्या वेतन निश्चितीची पडताळणी झालेली नाही. त्यामुळे सेवानिवृत्ती प्रकरणे ...
मूल : शिक्षकांच्या सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार करण्यात आलेल्या वेतन निश्चितीची पडताळणी झालेली नाही. त्यामुळे सेवानिवृत्ती प्रकरणे मंजुरीस विलंब होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्वरित सर्व शिक्षकांच्या सेवा पुस्तकांची पडताळणी करावी, अशी मागणी म. रा. प्राथमिक शिक्षक संघाने केली असून मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबत त्वरित नियोजन करून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
संघटनेचे राज्य सल्लागार संतोष कुंटावार व जिल्हाध्यक्ष सुभाष बेरड यांच्या नेतृत्वात शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांची नुकतीच भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांवर चर्चा केली. यात सेवा पुस्तकांच्या पडताळणी या मुख्य मागणीसह शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख, सेवानिवृत्त व मयत झालेल्या मुख्याध्यापकांची रिक्त असणारी पदे पदोन्नतीने भरावी. तसेच मयत व सेवानिवृत्तीने रिक्त झालेल्या विषय शिक्षकांच्या जागादेखील चालू सत्रात भराव्यात अशी मागणी संघटनेने यावेळी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पदोन्नतीने पदे भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही चालू असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असा विश्वास दिला.
अंशदायी पेन्शन योजनेअंतर्गत असलेल्या शिक्षकांचा सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता जुलै पूर्वी रोखीने मिळावा तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत सर्वच शिक्षकांना २५/३ च्या पत्रानुसार त्या क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा, अशी आग्रही भूमिका संघटनेने मांडली. यावर योग्य कार्यवाही करून त्वरित निर्णय घेण्याचे सीईओ यांनी मान्य केले आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस किशोर उरकुंडवार, सल्लागार मारोती जिल्हेवार, पंढरी म्हरस्कोल्हे , बंडू राठोड, सुरेश जिल्हेवार, लक्ष्मण सोयाम, सुरेश पाणघाटे, दिलीप साखरकर, माणिक पाटेवार आदी हजर होते.