चंद्रपूरच्या प्रदूषणावर चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:12 PM2018-07-15T23:12:56+5:302018-07-15T23:13:24+5:30
चंद्रपूरसारख्या शहरात वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. लोकांनी पुढाकार घेवून याबाबत सरकार व उद्योगांशी संवाद साधावा आणि सामान्य माणसाचा आवाज या लोकांपुढे मांडावा, असा विचार काही विद्वान मांडतात. याच विचाराला धरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘स्टार रेटिंग’ कार्यक्रमास मागच्या वर्षी सुरुवात केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरसारख्या शहरात वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. लोकांनी पुढाकार घेवून याबाबत सरकार व उद्योगांशी संवाद साधावा आणि सामान्य माणसाचा आवाज या लोकांपुढे मांडावा, असा विचार काही विद्वान मांडतात. याच विचाराला धरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘स्टार रेटिंग’ कार्यक्रमास मागच्या वर्षी सुरुवात केली होती. शहरात तर वायु प्रदूषण नियंत्रणाबाबत खूप कार्यक्रम होत राहतात. पण स्टार रेटिंगसारखा उपक्रम, उद्योगांच्या सावलीत राहणाऱ्या चंद्रपूर शहरात कसा वापरला जाऊ शकतो, याबाबत ग्रीन प्लॅनेट सोसायटी व शिकागो विद्यापीठाच्या एपिक-इंडिया या संस्थेने बजाज पॉलिटेक्निक महाविद्यालयात एक चर्चासत्र आयोजित केले होते.
या चर्चासत्रात प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात एपिक इंडियाचे ईशान चौधरी व जे-पाल संस्थेचे आर्कोपाल दत्त व गार्गी पाल हेही उपस्थित होते. संस्थेचे व्यवस्थापक भरत बजाज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य हरिनखेडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.सुरेश विधाते, विजय कोयल, प्रा.गुंडावार आणि प्रा. भास्करवार उपस्थित होते.
जवळपास ६० अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रात सहभाग घेवून प्रदूषणावर मात करीत चंद्रपूर शहराची हवा स्वच्छ ठेवण्याचा अट्टाहास धरला. या वेबसाईटवर व त्यांच्या सोशल मीडिया पेज वर आम्ही आमच्या शहराच्या प्रदूषणाची अवस्था फोटो किंवा व्हीडीओच्या माध्यमातून पोस्ट करून आमचा आवाज सरकारपर्यंत नेऊ शकतो, असे यावेळी अंकुश नावाचा विद्यार्थी म्हणाला. त्याला उपस्थित सर्वांनी प्रतिसाद दिला.
स्टार रेटिंग कार्यक्रम म्हणजे काय ?
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा स्टार रेटिंग कार्यक्रम असून यात अंदाजे २० हजार औद्योगिक वायु उत्सर्जनाच्या नमुन्यांची माहिती सहज उपलब्ध होऊ शकत आहे. या नवीन योजनेंतर्गत औद्योगिक संस्थांना त्यांच्या औद्योगिक वायू उत्सर्जनाच्या प्रमाणावरुन १ ते ५ तारांकन देण्यात आले आहे. १ तारांकन प्राप्त औद्योगिक संस्था ही जास्त प्रदूषणकारक म्हणजेच एमपीसीबी मान्यतांचे कमी पालन करणारी तर ५ तारांकन प्राप्त संस्था ही मान्यतांचे उत्तम पालन करणारी म्हणजेच अतिशय कमी प्रदूषणकारक संस्था असेल. औद्योगिक संस्था, शासन तसेच सामान्य जनतादेखील एमपीसीबी वेबसाईटवर जाऊन आपल्या विभागातील औद्योगिक संस्थांचे तारांकन पाहू शकतील. आपल्या विभागातील औद्योगिक संस्था सहज शोधण्यासाठी विभाग, क्षेत्र तसेच तारांकन या तीन विभागांचा आधारदेखील घेऊ शकतील.