विद्यार्थ्याच्या खुनाच्या तपासात दिरंगाई
By admin | Published: May 13, 2017 12:31 AM2017-05-13T00:31:07+5:302017-05-13T00:31:07+5:30
तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील वेकोलिच्या वसाहतीत राहणाऱ्या व इयत्ता १० वीत शिक्षण घेणारा विद्यार्थी प्रद्युम सूरज बरडे (१७) याचा .....
पित्याचा आर्त टाहो : खुनातील आरोपींना अटक करा
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील वेकोलिच्या वसाहतीत राहणाऱ्या व इयत्ता १० वीत शिक्षण घेणारा विद्यार्थी प्रद्युम सूरज बरडे (१७) याचा मृतदेह २६ एप्रिल रोजी वरोरा तालुक्यातील डोंगरगाव (खडी) येथे टेकडीवर आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेच्या तपासात पोलीस प्रशासन दिरंगाई करीत असल्याचे दिसून येते. तर खुनातील आरोपीना अटक करण्याची मागणी सूरज बरडे यांनी केली आहे.
चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव (पोडे) येथील प्रद्युम बरडे हा विद्यार्थी १३ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजतादरम्यान तीन मित्रांसमवेत घरून बाहेर पडला. त्यावेळी तो दुचाकी सोबत घेऊन गेला होता. सायंकाळ होवूनही मुलगा घरी न परतल्यामुळे त्याचे आईवडील चिंतातूर झाले होते. नातेवाईकाकडे व मित्रांकडे शोध घेवूनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर त्यांनी मुलगा हरविल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. दरम्यान, प्रद्युमची दुचाकी अंचलेश्वर गेट बसस्थानकाजवळ आढळून आली. मुलगा बेपत्ता झाल्याने आई-वडिलासह वेकोलिच्या वसाहतीत राहणारे अन्य पालकही त्रस्त झाले होते.
प्रद्युम बरडे चंद्रपूर येथील परॉमाऊंट कान्व्हेंटमध्ये इयत्ता १० वीमध्ये शिक्षण घेत होता. त्याने नुकतीच परीक्षा दिली होती. तीन मित्रांसोबत बाहेर पडलेला मुलगा १२-१३ दिवस होवूनही घरी आला नव्हता. तो आप्तेष्टांकडेही सापडला नाही. त्यामुळे आई-वडिलाची चिंता वाढली होती. अशातच २६ एप्रिल रोजी वरोरा तालुक्यातील डोंगरगाव (खडी) गावालगतच्या निर्जनस्थळी टाकडीवर छिन्नविछिन्न अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख अंगावरील कपडे व पायातील जोडा, दुचाकीची किल्ली आदीरून पटली. त्याच दिवशी पोलिसानी त्याच्या मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांचा तपास पुढे सरकला नाही, असे पित्याचे म्हणणे आहे.
घटनास्थळ वरोरा पोलीस ठाण्यात असून याबाबत गुन्हा चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. चंद्रूपरचे पोलीस घटनेचा तपास करीत असल्याचे वरोरा पोलीस सांगत आहेत. प्रद्युम बरडेची हत्या संघटित व नियोजन पद्धतीने करण्यात आली. गावापासून ४० किलोमीटर अंतरावर नेवून त्याला ठार करण्यात आले. यामुळे नांदगाव (पोडे) गावात व वेकोलिच्या वसाहतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने माझ्या मुलाच्या खुनातील आरोपींना तत्काळ अटक करून न्याय मिळवून द्यावा, असा आर्त टाहो त्याच्या वडिलाने ‘लोकमत’ जवळ फोडला आहे.