तस्करी करणाऱ्यांकडून मृत जनावरांची रस्त्याच्या कडेला विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:02+5:302021-07-11T04:20:02+5:30
देवाडा : राजुरा तालुक्यातील तेलंगणा महाराष्ट्र राज्य सीमेवर लक्कडकोट गावाच्या काही अंतरावर असलेल्या घाटावरील महामार्गावर अवैध जनावरे तस्करी करणाऱ्यांकडून ...
देवाडा : राजुरा तालुक्यातील तेलंगणा महाराष्ट्र राज्य सीमेवर लक्कडकोट गावाच्या काही अंतरावर असलेल्या घाटावरील महामार्गावर अवैध जनावरे तस्करी करणाऱ्यांकडून मृत झालेली जनावरे रस्त्याच्या कडेला फेकली जातात, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
महामार्गावर शेकडो वाहनांची ये-जा असते. चंद्रपूर- आसिफाबाद महामंडळ बस नेहमीच सुरू असतात. महाराष्ट्र राज्य सीमा व तेलंगणा राज्याची सुरुवात घाटावरून होते. त्यामुळे काही गावे सीमेलगत असल्यामुळे येथील व्यापारी मागील काही वर्षांपासून जनावरे तस्करीचा गोरखधंदा करीत आहेत. यातून ते गब्बर झाले आहेत. यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची भीती वाटत नसल्यामुळे दिवसरात्र जनावरांची तस्करी सुरू असते. जनावरे चांगली राहिली तर विक्री करतात. जनावरांचा मृत्यू झाला तर घाटावरच्या रस्त्यावर ती जनावरे फेकली जातात. याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, दुर्गंधी पसरून आजारी होण्याची शक्यता आहे, याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी केली आहे.