तंटामुक्त गाव समित्यांना घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:30 AM2021-09-18T04:30:33+5:302021-09-18T04:30:33+5:30
राजकुमार चुनारकर चिमूर : माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती योजना अस्तित्वात आणली. ...
राजकुमार चुनारकर
चिमूर : माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती योजना अस्तित्वात आणली. या समितीने उल्लेखनीय कामगिरी बजावत तंटे, वादविवाद यावर नियंत्रण मिळवून एकोपा, शांतता व सामोपचाराचे वातावरण राखण्यात यश प्राप्त केले होते. मात्र, सध्या या समित्यांची पिछेहाट सुरू झाली आहे.
तंटामुक्त गाव समित्यांची प्रभावी अंमलबजावणी संबंध राज्यभर झाली. महात्मा गांधींना अपेक्षित असलेले तंटामुक्त गाव निर्माण व्हावे, या उद्देशाने सदर समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यानंतर, या समित्यांमार्फत गावस्तरावरील वाद, किरकोळ भांडणे गावातच मिटविण्याचे प्रयत्न गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, प्रतिष्ठित नागरिक यांच्यामार्फत यशस्वीरीत्या झाले. किरकोळ प्रकरणांमध्ये मध्यस्थाची भूमिका घेऊन बरीच प्रकरणे वाढविण्याऐवजी तंटामुक्त ग्राम समितीच्या माध्यमाने त्यांच्यात समन्वयाची व सामंजस्याची भूमिका घेऊन वादाचा निपटारा करीत होती. याचा लेखाजोखाही काही काळ तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षाकडे लेखी स्वरूपात होता. त्याची पूर्तता करून, तो पोलीस प्रशासनाकडे सुपुर्द करायचा होता.
मात्र, चिमूर तालुक्यातील तंटामुक्त ग्राम समिती गेल्या काही वर्षांपासून केवळ कागदावरच उरली आहे. आता गावात कोण तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष आहे, याचाही थांगपत्ता नाही.
बॉक्स
बैठकीला बोलावतात पोलीस पाटलांना
गावातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, यासाठी पोलीस पाटलांना बैठकीला बोलावले जाते. त्या प्रमाणात तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षांना महत्त्व दिले जात नसल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. त्यामुळे गाव खेड्यातले तंटे कमी होण्याऐवजी किंवा गाव तंटामुक्त होण्याऐवजी गाव तंटायुक्त होत चालले आहे.
बॉक्स
नव्या स्वरूपात समित्या स्थापन करण्याची गरज
गाव जर खरंच तंटामुक्त व्हावे, अशी शासन प्रशासन व राज्यकर्त्यांची भूमिका असेल, तर पुन्हा गावागावांत तंटामुक्त ग्राम समितीचे नवे स्वरूप निर्माण करणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासन, स्थानिक प्राधिकरण यांचा मेळ घालून प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, वनाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदी सर्वसमावेशक लोकांचा सहभाग घेऊन, तंटामुक्त गाव समितीला ग्रहणातून मुक्त करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
कोट
तंटामुक्त गाव समित्या पुन्हा नव्या जोमाने कार्याला लागल्यास गाव तंटामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी पुन्हा प्रशासनाने कंबर कसण्याची गरज निर्माण झाली आहे.
- प्रशांत कोल्हे, सरपंच ग्रामपंचायत, वाहानगाव.