मनपा गटनेतेपदाचा वाद आता विभागीय आयुक्तांच्या दरबारात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:33 AM2021-09-04T04:33:53+5:302021-09-04T04:33:53+5:30
मनपाचे गटनेते वसंत देशमुख यांना भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून स्थायी समिती सभापतिपदाचे आश्वासन मिळाले होते; मात्र अखेरच्या क्षणी रवी ...
मनपाचे गटनेते वसंत देशमुख यांना भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून स्थायी समिती सभापतिपदाचे आश्वासन मिळाले होते; मात्र अखेरच्या क्षणी रवी आसवानी यांची सभापतीपदी वर्णी लागली. तेव्हापासून महानगरपालिकेत भाजप नगरसेवकांमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. स्थायी समितीतून आठ सदस्य निवृत्त झाल्यानंतर पुन्हा एकदा सभापतिपदासाठी भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा -वाद सुरू झाला. याच वादातून भाजपचे गटनेते देशमुख यांना संजय कंचर्लावर आणि सभागृह नेते संदीप आवारी यांची नावे स्थायी समितीत पाठविण्याची शिफारस पक्षश्रेष्ठींनी केली; मात्र ही दोन्ही नावे पाठवण्यास देशमुख यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपने पाच दिवसांपूर्वी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला ३४ नगरसेवक उपस्थित होते. यावेळी वसंत देशमुख यांची गटनेते पदावरून उचलबांगडीचा निर्णय घेण्यात आला. मुद्रांकावर नगरसेवकांची स्वाक्षरी घेतल्याची चर्चा आहे. ३९ पैकी ३४ नगरसेवकांनी भाजप हायकमांडच्या निर्णयाचे समर्थन केल्याचे बोलले जात आहे. तीन दशकांपासून पक्षाची निष्ठेने सेवा केल्याने लढाई लढून गटनेते पद कायम ठेवण्यासाठी नागपुरात वकील व विभागीय आयुक्तांची भेट घेण्याची तयारी देशमुख यांनी सुरू केल्याचे समजते. स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक होण्यापूर्वीच थेट गटनेता बदलविण्याच्या हालचाली सुरू झाल्याने भाजपच्या काही प्रामाणिक नगरसेवकांची अस्वस्थता वाढली आहे.