लसीकरण केंद्रावर वाढले वाद, पोलीस तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:23 AM2021-05-03T04:23:01+5:302021-05-03T04:23:01+5:30
चंद्रपूर : कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून रुग्णालये फुल्ल झाली आहेत. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी ...
चंद्रपूर : कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून रुग्णालये फुल्ल झाली आहेत. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरी राहणे हा एकमेव पर्याय असून, सुरक्षिततेसाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. मात्र आता लसीकरण केंद्रावर नागरिक गर्दी करीत आहे. त्यामुळे या केंद्रावर वाद वाढले आहे. परिणामी, गर्दीवर नियंत्रण ठेवणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे आता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलीस तैनात करण्यात आले आहे. चंद्रपूर शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी रविवारी १२ केंद्र सुरू होते, तर दुसरा डोस घेण्यास शहरातील विविध तीन केंद्रांचा समावेश होता. विशेष म्हणजे, १८ ते ४४ वर्षातील नागरिकांसाठी शहरात दोन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मात्र या केंद्रावर क्षमतेपेक्षा गर्दी झाल्यामुळे अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. विशेष म्हणजे, दोन दिवसापूर्वीच महापालिकेने पोलीस प्रशासनाकडे यासंदर्भात माहिती देऊन पोलीस संरक्षण मागितले होते. त्यामुळे रविवारी चंद्रपुरातील बहुतांश केंद्रावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. नागरिकांनी किमान या संकटसमयी तरी संयम ठेवणे गरजेचे आहे, मात्र तसे होताना दिसत नाही.
दरम्यान, १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांना प्राथमिक शाळा, पोलीस स्टेशन समोर, ब्रह्मपुरी, रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा, रामनगर, चंद्रपूर, पंजाबी सेवा समिती, तुकुम, चंद्रपूर, नाट्य सभागृह, बल्लारपूर, समाज मंदिर रामनगर राजुरा, बुद्ध लेणी विजासन भद्रावती, जनता कन्या विद्यालय, नागभीड या केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली.