बारमाही वनमजूर वेतनापासून वंचित
By Admin | Published: October 21, 2016 01:01 AM2016-10-21T01:01:30+5:302016-10-21T01:01:30+5:30
चिचपल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या परिक्षेत्रातील बारमाही वनमजुरांना गेल्या जुलै महिन्यापासून वेतन न मिळाल्याने उपासमारीची पाळी आली आहे.
उपासमारीची पाळी : वनविभागाचे दुर्लक्ष
मूल : चिचपल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या परिक्षेत्रातील बारमाही वनमजुरांना गेल्या जुलै महिन्यापासून वेतन न मिळाल्याने उपासमारीची पाळी आली आहे. नियमीत वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्परतेने वेतन देण्यात येते. मात्र जंगलात राबराब राबणाऱ्या वनमजुरांना मात्र वेतनापासून वंचित ठेवले जात असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना त्वरीत वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष बंडू देशमुख व कार्याध्यक्ष किशोर सोनटक्के यांनी केली आहे.
वनविभागात सन १९८८ पासून कार्यरत असणारे बारमाही वनमजुर जंगलाचे संरक्षण करण्यास नेहमीच तत्पर असतात. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे ते गेल्या २८ वर्षांपासून वनविभागात कार्यरत असतानाही स्थायी करण्यास डोळेझाक झाली आहे. तुटपुंज्या वेतनावर वनमजुर संसाराचा गाडा हाकलत असताना तुटपुंजे वेतन सुद्धा वेळेवर होत नसल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती दयनिय झाली आहे.
माहे जुलैपासून वेतन नसल्याने विविध येणारे आर्थिक उत्सव व शैक्षणिक बाबीची पुर्तता करण्यास वनमजुर असमर्थ ठरत आहेत. या गंभीर बाबीकडे लक्ष घालून बारमाही मजुरांना न्याय देऊन वेतन देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)