दीपावलीतील ‘आनंदाचा शिधा’ला पोर्टेबिलिटीचे विघ्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2022 09:29 PM2022-10-26T21:29:08+5:302022-10-26T21:29:47+5:30
ऑक्टोबर २०२२ मध्ये दिवाळीनिमित्त शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त १०० रुपयांत शिधाजिन्नस संच (दिवाळी किट) उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्ह्यातील ४ लाख ९ हजार २७५ शिधापत्रिकाधारकांना ही दिवाळी किट देण्याचे नियोजन पुरवठा विभागाने केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाने दिवाळी उत्सवात आनंदाचा शिधा ऑफलाइन पद्धतीने वितरणाचा निर्णय घेतला. जिल्ह्यातही वितरणाला सुरूवात झाली. मात्र, पोर्टेबिलिटी केलेल्या अनेक रेशन कार्डधारकांना या किटपासून वंचित राहावे लागणार, अशी शंका व्यक्त होत आहे. दरम्यान, सर्वच तालुक्यांत आनंदाचा शिधा किट गर्दी न होता सुरळीत वितरण सुरू असल्याचा दावा पुरवठा विभागाने केला. परंतु, रेशन दुकानांसमोरील रांगा कायम आहेत.
ऑक्टोबर २०२२ मध्ये दिवाळीनिमित्त शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त १०० रुपयांत शिधाजिन्नस संच (दिवाळी किट) उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्ह्यातील ४ लाख ९ हजार २७५ शिधापत्रिकाधारकांना ही दिवाळी किट देण्याचे नियोजन पुरवठा विभागाने केले. या किटमध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर व पामतेलाचा समावेश आहे. जिल्ह्यात अंत्योदय योजनेंतर्गत १ लाख ३८ हजार ३९३ शिधापत्रिकाधारक तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत २ लाख ७० हजार ८८२ असे एकूण ४ लाख ९ हजार २७५ शिधापत्रिकाधारक आहेत. या कुटुंबांना दिवाळीनिमित्त एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल या चार शिधाजिन्नसांचा समावेश असलेला संच जिल्ह्यातील सर्व सरकारी रास्त भाव दुकानांत दिवाळी किट उपलब्ध करून देणे सुरू आहे.
परजिल्ह्यातील स्थलांतरित कार्डधारकांसमोर समस्या
‘वन नेशन वन रेशन’ मोहिमेत एका जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दुसरीकडे ऑनलाइन पद्धतीने रेशन घेण्याचा अधिकार मिळाला. त्यासाठी नजीकच्या दुकानातून रेशनकार्ड पोर्टेबिलिटी करून घेणे बंधनकारक आहे. या मोहिमेतंर्गत राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून चंद्रपूरमध्ये स्थलांतरित झालेल्या रेशनकार्डधारक कुटुंबीय दर महिन्याला ऑनलाइन पद्धतीने रेशन घेतात. मात्र, पोर्टेबिलिटी केलेल्या अशा कार्डधारक आनंदाचा शिध्यापासून वंचित राहावे लागत आहे.
पोर्टेबिलिटीधारकांचा हिरमोड
शिध्याचे किट ऑनलाइन वितरणात अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे शासनाने निर्णय घेत ऑफलाइनचा निर्णय घेतला. ऑफलाइन वितरणावेळी रेशनकार्ड लाभार्थ्यांना त्यांना जोडून दिलेल्या मूळ दुकानामधून हा शिधा घेण्याचे बंधन घातले. याचा फटका पोर्टेबिलिटी केलेल्या कार्डधारकांना बसत आहे. त्यांना त्यांच्या मूळ गावीच हे किट उपलब्ध होईल, असे सांगितले जात आहे.
असे आहेत कार्डधारक
- पुरवठा विभागाच्या गोदामानुसार, बल्लारपूर येथे अंत्योदय योजना कार्ड संख्या व प्राधान्य गट योजना कार्ड संख्या अशी एकूण कार्ड संख्या २२८५५ आहे. भद्रावती २४६८६, ब्रह्मपुरी ३६३५२, चंद्रपूर २४४२७, बाबूपेठ ३३८६६, चिमूर २१७६५, नेरी १६०२१, गोंडपिपरी १८०७१, जिवती १३२६८, कोरपना २१४७२, मूल २५५०३३, नागभीड १४९८४, तळोधी १३९१४, पोंभुर्णा १२६७६, राजुरा २४७१०, सावली १००८२, पाथरी १४५५५, सिंदेवाही २४८२३ आणि वरोरा ३२७१५ असे एकूण ४ लाख ९ हजार २७५ कार्डधारकापर्यंत ‘आनंदाचा शिधा’ पोहोचवावे लागणार आहे.