जि. प. सदस्यांची हैदराबाद पर्यटनवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 06:00 AM2019-12-28T06:00:00+5:302019-12-28T06:00:23+5:30
अध्यक्षपद यावेळी महिलांसाठी राखीव आहे. या पदासाठी मोठी आर्थिक ताकद लावणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे महिला सदस्यांमध्ये फारशी चुरस नसल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी भाजपकडे माजी अध्यक्ष संध्या गुरनुले, कृषी सभापती अर्चना जीवतोडे, नितू चौधरी, वैष्णवी बोडलावार, वैशाली बुद्धलवार यांच्या नावाची चर्चा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषदेत भाजपचे ३६ सदस्य असले तरी अध्यक्षपदासाठी दगाफटका होऊ नये, या हेतूने पक्षातील हायकमांडच्या आदेशानुसार सर्व सदस्यांना राज्याबाहेर पर्यटनाला नेण्यासाठी शुक्रवारी हालचालींना वेग आला होता. शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अध्यक्षांच्या निवासस्थानावरून विशेष वाहनाद्वारे हैदराबादला रवाना होणार आहेत.
अध्यक्षपद यावेळी महिलांसाठी राखीव आहे. या पदासाठी मोठी आर्थिक ताकद लावणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे महिला सदस्यांमध्ये फारशी चुरस नसल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी भाजपकडे माजी अध्यक्ष संध्या गुरनुले, कृषी सभापती अर्चना जीवतोडे, नितू चौधरी, वैष्णवी बोडलावार, वैशाली बुद्धलवार यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, भाजपपाठोपाठ काँग्रेसचे सदस्यही पर्यटनाला जाण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्राने दिली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत नोव्हेंबर महिन्यात काढण्यात आली. अध्यक्षपद महिलांसाठी निघाल्याने पुरूष सदस्यांचा अपेक्षाभंग झाला. जि. प. मध्ये भाजपचे ३६ तर काँग्रेसचे २० सदस्य निवडून आले. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. देवराव भोंगळे यांची अध्यक्षपदी, तर क्रिष्णा सहारे यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली. अडीच वर्षांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यातच संपुष्टात आला होता. मात्र, शासनाने तीन महिन्यांचा कार्यकाळ वाढवून दिला होता. हा कालावधी संपल्याने निवडणूक जाहीर झाली. गेल्या काही दिवसांपासून अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या महिला जि. प. सदस्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु, शेवटच्या क्षणी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा कायम राहतील हे जवळपास निश्चित आहे. जि.प. वर सत्ता आणण्यासाठी राज्याचे माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे परिश्रम घेतले होते. आता नव्या अध्यक्षांची निवडीतही भाजपकडून त्यांचीच भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
४ जानेवारीला निवडणूक
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक ४ जानेवारीला कर्मवीर कन्नमवार सभागृहात होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येईल. दुपारी १ वाजता सभेला सुरुवात होईल. १ वाजेपासून नामनिर्देशन पत्राची छाननी, दुपारी १.१५ ते १.३० वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेणे तर दुपारी १.३० वाजतानंतर आवश्यकता असल्यास मतदान घेऊन अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.
ऊर्जानगरात होणार जिल्हा क्रीडा महोत्सव
जि. प. च्या शिक्षण व क्रीडा समितीची शुक्रवारी अखेरीची बैठक झाली. या बैठकीत उर्जानगर येथे २८ ते २९ डिसेंबर २०१९ पासून जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव घेण्याचा ठराव पारित करण्यात आला. अल्प निधीमुळे हा प्रश्न प्रलंबित होता. जि. प. अध्यक्ष व शिक्षण सभापती क्रिष्णा सहारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. पुढील वर्षी नवरत्न क्रीडा स्पर्धेचा विस्तार करण्याबाबत चर्चा झाली. अध्ययन निष्पतीमध्ये नागपूर विभागातून जि. प. चा दुसरा क्रमांक आला. जि. प. शाळेतील ५४ टक्के विद्यार्थ्यांनी गोष्ट स्तरावरील अध्ययन प्रक्रियेत सरस ठरल्याने सहा जिल्ह्यातून दुसºया क्रमांकावर आले. गणित या गटातही द्वितीय आल्याची माहिती डायटचे प्रा. राजपुत यांनी सभेत दिली. क्रीडा स्पर्धेसाठी तोकडी तरतूद असल्याने खेळताना विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास मदत देण्यास जि. प. असमर्थ ठरते. शिवाय, स्पर्धेसाठी बराच वेळ वाया जातो, याकडे जे. डी. पोटे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे स्वतंत्र क्रीडा स्पर्धेऐवजी नवरत्न स्पर्धेचा विचार करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे पुढील सत्रात स्वतंत्र क्रीडा स्पर्धा गुंडाळण्याची चर्चा सुरू जि. प. वर्तुळात सुरू झाली आहे. अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया २९ शिक्षकांच्या प्रकरणांवरही चर्चा झाली. यावेळी योगिता डबले, पृथ्वीराज अवतळे, नितू चौधरी, गोपाल दडमल, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर, उपशिक्षणाधिकारी पवार व सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.