पीक कर्जाचे वाटप करा, अन्यथा शेतकरी करणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:31 AM2021-09-23T04:31:22+5:302021-09-23T04:31:22+5:30
शेतकरी संघटना जिवती तालुक्याच्या वतीने भारतीय स्टेट बॅंक शाखा पाटणच्या व्यवस्थापकांना पीक कर्जाचे तत्काळ वाटप करा अशा आशयाचे निवेदन ...
शेतकरी संघटना जिवती तालुक्याच्या वतीने भारतीय स्टेट बॅंक शाखा पाटणच्या व्यवस्थापकांना पीक कर्जाचे तत्काळ वाटप करा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, मूग, उडीद इत्यादी पिकांची लागवड केली आहे. गतवर्षी परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे आणि कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी अगोदरच संकटात सापडला आहे. पीक कर्जावर आस धरून शेतकऱ्यांना खरीप हंगाम संपत आला तरी पीक कर्जाचे वाटप झाले नाही. शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज काढून पेरणी केली आहे. त्यामुळे शेतकरी अजून जास्त संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची समस्या समजून घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप १० दिवसांत करावे, अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाटण समोर डफडी बजाओ आंदोलन करण्यात येईल,असा इशारा शेतकरी संघटना तालुका जिवतीच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. निवेदन देताना सय्यद शब्बीर जागीरदार, तालुकाप्रमुख शेतकरी संघटना, रामेश्वर नामपल्ले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.