दिव्यांग शिबिरातील लाभार्थ्यांना साधने वितरित करा

By admin | Published: October 13, 2016 02:25 AM2016-10-13T02:25:05+5:302016-10-13T02:25:05+5:30

बल्लारपूर येथे आयोजित दिव्यांगांच्या शिबिरास प्रचंड प्रतिसाद लाभला होता. यावेळी साहित्यासाठी दिव्यांगांनी नोंदणी केली होती.

Distribute tools to the beneficiaries of Divyang Camp | दिव्यांग शिबिरातील लाभार्थ्यांना साधने वितरित करा

दिव्यांग शिबिरातील लाभार्थ्यांना साधने वितरित करा

Next

सुधीर मुनगंटीवार: दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांचा घेतला आढावा
चंद्रपूर : बल्लारपूर येथे आयोजित दिव्यांगांच्या शिबिरास प्रचंड प्रतिसाद लाभला होता. यावेळी साहित्यासाठी दिव्यांगांनी नोंदणी केली होती. ज्या दिव्यांगांना साहित्य पुरविणे आवश्यक आहे, त्यांना तातडीने साहित्याचे वितरण करा, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
दिव्यांगांना साधने पुरविण्याबाबत गठीत समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभुषण पाझारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्यासह गठीत समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
बल्लारपूर येथे झालेल्या शिबिरात १३४४ दिव्यांग बांधवांनी साहित्यासाठी नोंदणी केली होती. या बांधवांना जिल्हा परिषदेच्या वतीने तसेच काहींना केंद्र शासनाच्या वतीने साहित्य वितरित केले जाणार आहे. जे लाभार्थी अपंग टक्केवारीच्या आधारावर केंद्र किंवा राज्य शासनाच्या निकषात बसत नाही, अशांना सीएसआर निधीच्या माध्यमातून साहित्य पुरविले जावे, असे ते म्हणाले. येत्या एक महिन्यात साहित्य वाटपाची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हा परिषदेकडे तीन टक्के अपंग निधीतील बरीच रक्कम शिल्लक आहे. दिवाळीपूर्वी या निधीतून दिव्यांग बांधवांना लाभ देण्यात यावा. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची सविस्तर माहिती असलेले संकेतस्थळ निर्माण केले जावे. जिल्ह्यात दिव्यांगांसाठी अत्याधुनिक फिजीओथेरपी सेंटर निर्माण करावे. अपंग पुनर्वसनाचा वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अपंग महामंडळाचे सध्या वरच्या मजल्यावर असलेले कार्यालय इतर ठिकाणी हलविण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. दिव्यांगाच्या कल्याणासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची नियमित बैठक घेण्यासोबतच समितीच्या सदस्यांना ओळखपत्र दिले जावे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अपंगांच्या सोईच्या दृष्टीने झेब्रा क्रॉसिंगच्या सूचनाही त्यांनी बांधकाम विभागास केल्या. तसेच समितीच्या सदस्यांना सर्व पत्रव्यवहाराच्या प्रति देण्यासोबतच मतीमंदांसाठी असलेल्या कल्याण निधीच्या पैशाचा योग्य विनियोग करण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी बैठकीत केली.(शहर प्रतिनिधी)

दिव्यांगांसाठी रोजगाराच्या अनुषंगाने क्लस्टर
वर्धा जिल्ह्यात सोलर चरख्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशाच पध्दतीने दिव्यांग बांधवांसाठी रोजगाराचे स्वतंत्र क्लस्टर करण्याचा आपला मानस असल्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. जिल्ह्यात अपंगांसाठी उत्तम कार्य केले जावे. जिल्ह्यातील कायार्चा इतर जिल्ह्यांनी आदर्श घ्यावा, इतके चांगले काम असावे, असेही ते म्हणाले. दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजनांचा आढावाही त्यांनी घेतला.

Web Title: Distribute tools to the beneficiaries of Divyang Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.