२१ हजार ६७० लाभार्थ्यांना १७ हजार १४६ क्विंटल धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:31 AM2021-09-05T04:31:41+5:302021-09-05T04:31:41+5:30
मंगल जीवने बल्लारपूर : कोरोना काळात शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी ...
मंगल जीवने
बल्लारपूर : कोरोना काळात शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी पाच किलो तांदूळ व गहू मोफत देण्यात आले. त्यानुसार, मे ते ऑगस्ट या चार महिन्यांत बल्लारपूर तालुक्यातील ६६ रास्तभाव दुकानदारांनी अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील २१ हजार ६७० लाभार्थ्यांना सुमारे १६ हजार १४६ क्विंटल रेशन वाटप करण्यात आले. त्यांना पुढे नोव्हेंबरपर्यंत धान्य देण्यात येणार आहे, तर दुसरीकडे सणवार सुरू झाले असून, अजूनही रास्त भाव दुकानातून तूर डाळ व तेल बेपत्ता आहे.
बल्लारपूर तालुक्यात शिधापत्रिकाधारक २४ हजार ६७३ आहेत. यामध्ये ३ हजार ३ केसरी शिधापत्रिकाधारक आहेत, परंतु मोफत धान्य योजना ही प्राधान्य व अंत्योदय लाभार्थ्यांसाठी आहे. तालुक्यात प्राधान्य शिधापत्रिकाचे १४ हजार २७० लाभार्थी आहेत. प्राधान्य लाभार्थ्यांना गहू प्रति व्यक्ती ३ किलो दर २ रुपये प्रतिकिलो प्रमाणे व तांदूळ प्रति व्यक्ती २ किलो दर ३ रुपये प्रमाणे देण्यात येत आहे. अंत्योदयचे ७ हजार ४०० लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना १५ किलो गहू व २० किलो तांदूळ वितरित करण्यात येत आहे. मे, जून, जुलै, ऑगस्ट या चार महिन्यांत अंत्योदय लाभार्थ्यांना ३ हजार २१०.५० क्विंटल गहू वाटप करण्यात आले, तर तांदूळ २ हजार १४६.५० क्विंटल वाटप करण्यात आले. याशिवाय प्राधान्य लाभार्थ्यांना ६ हजार ४७४.५० क्विंटल गहू वाटप करण्यात आले व तांदूळ ४ हजार ३१४.५० क्विंटल वाटप करण्यात आले, असे एकूण २१ हजार ६७० शिधापत्रिकाधारकांना १६ हजार १४६ क्विंटल धान्य वाटप करण्यात आले.
बॉक्स
केशरी शिधापत्रिका
तालुक्यात ३ हजार ३ केशरी (एपीएल) शिधापत्रिकाधारक आहेत, परंतु त्यांना धान्याचे नियतन मिळत नसल्याचे पुरवठा निरीक्षक यांनी सांगितले. यासाठी आप पक्षाचे रवि पुप्पलवार यांनी केशरी शिधापत्रिका यांना धान्य देण्यात यावे, म्हणून तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे.
बॉक्स
किरायाने रास्तभाव दुकाने
बल्लारपूर तालुक्यात ६६ रास्तभाव दुकानांपैकी ११ कंट्रोलची दुकाने महिला बचत गटास दिले आहेत. यापैकी तीन दुकाने ग्रामीण भागात आहेत, तर आठ रास्तभाव दुकाने बल्लारपूर शहरात महिला बचत गट न चालविता दुसऱ्याला किरायाने दिली आहे. यामुळे धान्य वितरणामध्ये धांदली होत आहे. अशा दुकानदारावर कारवाईची मागणी होत आहे.
पावती न देण्याचे रहस्य
रेशन दुकानातून होणाऱ्या स्वस्त धान्याची विक्री अत्यंत पारदर्शक पद्धतीने व्हावी, या उद्देशाने तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानांमध्ये पॉस मशीन लावण्यात आली. रास्तभाव दुकानदारांनी अन्नधान्य वाटप करताना, त्या शिधापत्रिकेचा क्रमांक, त्यावरील सदस्यांची संख्या, तसेच शिधापत्रिकेवरील इतर संपूर्ण तपशील आदींच्या नोंदी स्वतंत्र नोंदवहीत ठेवायच्या आहेत व धान्य घेतलेल्या ग्राहकास दुकानदाराने ई-पॉस मशीनची पावती देण्याचे निर्देश असताना कोणीच रेशन दुकानदार ग्राहकास ही पावती देत नाही.
कोट
खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत प्राधान्य व अंत्योदय व इतर योजनेंतर्गत स्वस्त दरातील धान्य पोहोचावे, हा शासनाचा उद्देश आहे. जर याचे उल्लंघन कोणी रेशन दुकानदार करीत असेल, तर ग्राहकांनी आमच्याकडे तक्रार करावी.
- प्रियंका खाडे, पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय, बल्लारपूर.