१२२ दिव्यांगांना सायकलींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 06:00 AM2019-09-17T06:00:00+5:302019-09-17T06:00:25+5:30
शासनाच्या अटल स्वावलंबन मिशन योजनेंतर्गत समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद व सहायक आयुक्त, समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील १२२ दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंचलित तीनचाकी सायकलींचे वाटप सोमवारी करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनाच्या अटल स्वावलंबन मिशन योजनेंतर्गत समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद व सहायक आयुक्त, समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील १२२ दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंचलित तीनचाकी सायकलींचे वाटप सोमवारी करण्यात आले.
सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात आयोजित सायकल वितरण व मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटन आमदार डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार, नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त राजेश पांडे, जि.प. सदस्य रमेश बारसागडे, जात पडताळणी कार्यालयाच्या संशोधन अधिकारी पुष्पलता आत्राम, अपंग कल्याण संघटनेचे जिल्हा सचिव प्रकाश मारबते, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना विविध योजनाचा लाभ देण्यासाठी प्रशासन कटिबध्द आहे. दिव्यांग बांधवांनी जागृत राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. नगराध्यक्ष योगीता पिपरे म्हणाल्या, शरीरातील एखाद्या अवयवाने अपंगत्व असले तरी दिव्यांग नागरिकांमध्ये सामर्थ्य असते. काही तरी करण्याची जिद्द असते. दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील आहे. आपण नगर पालिकेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी व त्यांच्या सन्मानासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन पिपरे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश पेंदाम, संचालन राजू वडपल्लीवार, आभार पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.