लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वितरण
By admin | Published: November 8, 2015 01:16 AM2015-11-08T01:16:38+5:302015-11-08T01:16:38+5:30
दिवाळीच्या सणामध्ये चंद्रपुरात स्वस्त धान्य दुकानातून अतिशय निकृष्ट दर्जाचा गहू गोरगरिबांच्या माथी मारला जात आहे.
चंद्रपूर : दिवाळीच्या सणामध्ये चंद्रपुरात स्वस्त धान्य दुकानातून अतिशय निकृष्ट दर्जाचा गहू गोरगरिबांच्या माथी मारला जात आहे. भारतीय खाद्य निगमने पाठवलेला हा गहू परत न पाठवता तो जशाच्या तशा लोकांना वाटला जात आहे. यामुळे लोकांमध्ये मोठा संपात व्यक्त होत आहे.
स्वस्त धान्य दुकानांमध्ये जे धान्य वितरित केले जाते. त्याचा पुरवठा भारतीय खाद्य निगमद्वारे केला जातो. रेल्वेने हा माल चंद्रपुरात पाठवला जातो. नंतर तो वखार महामंडळाच्या गोदामामध्ये वाळवून नंतर त्याचा पुरवठा अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार स्वस्त धान्य दुकानात केला जात आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी हा निकृष्ट गहू येथील गोदामांमध्ये आला. तेव्हाच तो निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले होते. सुमारे अडीचशे पोते हा गहू होता. गुरेसुद्धा खाऊ शकणार नाही, इतका त्याचा दर्जा सुमार आहे. आधी हा गहू परत पाठवू, असे म्हणणारा पुरवठा विभाग नंतर कसा राजी झाला, हेच कळायला मार्ग नाही. याआधी याची वाच्यता माध्यमातून झाली होती. त्यानंतर पुरवठा विभागाने फूड कॉर्पो रेशन इंडियाला पत्र पाठवून गव्हाची उचल करणार नाही, असे पत्र पाठवले. पण, आता तोच गहू गोरगरीबांना वाटला जात असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सणासुदीच्या दिवसात असा निकृष्ट गहू गोरगरिबांच्या माथी मारुन त्याची थट्टा केली जात आहे. पर्याय नसल्यामुळे तो घ्यावा लागतो, अशी अगतिकता लोकांनी व्यक्त केली. यामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांची काहीही चुकी नाही. त्यांना जसा पुरवठा झाला, तसा ते वाटप करीत आहेत. तांदूळ आणि साखर चांगली आहे. पण गहू खराब असल्याने रेशन दुकानदारही चिंतीत आहेत. पण, त्यांचाही नाईलाज आहे. लोकांंना तो वाटण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. गोरगरिबांच्या नावाने अनेक योजना राबवून, त्यांच्याच मतांवर निवडून येऊन, त्यांचीच अशी गती केली जात असेल, तर मायबाप सरकार कोणत्या कामाचे, असा प्रश्न आता हे गोरगरीब करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)