निराधार विधवांना मदतीच्या धनादेशाचे वितरण
By admin | Published: July 7, 2015 01:06 AM2015-07-07T01:06:37+5:302015-07-07T01:06:37+5:30
बल्लारपूर तहसील कार्यालयाच्या वतीने दारिद्र्य रेषेखालील विधवांना राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेचे तालुक्यातील १० महिलांच्या अर्जाला मंजुरी प्राप्त झाली.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना : १० महिलांना प्रत्येकी २० हजारांचा धनादेश
बल्लारपूर: बल्लारपूर तहसील कार्यालयाच्या वतीने दारिद्र्य रेषेखालील विधवांना राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेचे तालुक्यातील १० महिलांच्या अर्जाला मंजुरी प्राप्त झाली. १० विधवा महिलांना प्रत्येकी २० हजारांच्या मदतीच्या धनादेशाचे वितरण शुक्रवारला उपविभागीय अधिकारी कल्पना निळ यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डी. एस. भोयर होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती अॅड. हरिश गेडाम, माजी उपसभापती सुमन लोहे, नायब तहसीलदार पी. डी. वंजारी, लिपीक सुनिल दडमल, दीपिका कोल्हे यांची उपस्थिती होती.
यावेळी बामणी (दुधोली) येथील रजनी रविंद्र गावंडे, कोठारी येथील कलावती बंडू कुर्रेवार, सुषमा सुनिल गोंधळी, कवडजई येथील रेखा अनिल चिचघरे, बल्लारपूर येथील मंगला संजय लभाने, रंजना सुनिल मंगर, शिल्पा शैलेश चव्हाण, सुशिला दादाजी निमसरकर, हेमलता सुरेंद्र बहुरिया यांच्या पतीचे अकाली निधन झाले. यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले. अशांना शासनाच्या कुटुंब अर्थ सहाय्य योजनेच्या प्रकरणाला तहसीलदार डी. एस. भोयर यांनी तातडीने मंजुरी दिली. शासनाकडून गरीब व दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकारी कल्पना निळ यांच्या हस्ते प्रदान करुन दिलासा देण्यात आला. यावेळी त्यांनी धनादेश बँक खात्यात जमा करुन योग्य ठिकाणी खर्च करुन कुटुंबाला आधार द्यावा, असे सांगितले. (शहर प्रतिनिधी)