पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा मिठाई वाटून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:09 PM2018-05-25T22:09:57+5:302018-05-25T22:10:11+5:30
पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढ व वाढती महागाईच्या विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना पुष्पगुच्छ, तिलक, मिठाई वाटप करून गुरुवारी अनोखे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढ व वाढती महागाईच्या विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना पुष्पगुच्छ, तिलक, मिठाई वाटप करून गुरुवारी अनोखे आंदोलन करण्यात आले.
सध्या पेट्रोल-डिझेलचे दर गगणाला भिडले आहे. तसेच देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य माणसाचे जगणे या महागाईमुळे कठीण झाले आहे. एवढे मोठे पेट्रोल, डिझेल भाव वाढविण्याचे कटकारस्थान भारतीय जनता पार्टीने केले आहे. याचा विरोध बीआरएसपीच्या वतीने करण्यात आला आहे. सदर आंदोलन बीआरएसपीचे विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे, युवा नेते इंजि. मोनल भडके यांच्या नेतृत्वात गुरुवारी जिल्हा परिषद समोरील पेट्रोल पंपावर करण्यात आले. यावेळी राजू झोडे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे आहे. वाढलेल्या प्रचंड महागाईमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट केली जात आहे. सरकारच्या मनमानी व हुकूमशाही धोरणामुळे सध्या सामान्य जनता भयभीत झाली आहे. अच्छे दिनाचे गाजर दाखवून या सरकारने सत्ता हस्तगत केली. आणि आता जनतेची लूट सुरू केली आहे. दिलेले आश्वासन शासनाने पाळले नाही. देशात मोठ्या प्रमाणात घोटाळे सुरूच आहे. त्यामुळे आता या सरकारला जनताच धडा शिकविणार असल्याचेही झोडे यांनी सांगितले. इंधन आणि गॅस दरवाढ तत्काळ कमी न झाल्यास बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी विदर्भात तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही राजू झोडे यांनी सरकारला दिला आहे.
यावळी इंजि. मोनल भडके, संजय मगर, राजू रामटेके, गुरु भगत, अजय पागडे, महेंद्र झाडे, अनुकूल शेंडे, संपत कोरडे, सुधीर गेडाम, शक्ती इंगोले, अनीश मानकर, शैलेश बारसागडे तसेच बीआरएसपीच्या कार्यकर्र्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.