निकृष्ट सौर कंदिलाचे वाटप
By admin | Published: July 10, 2014 11:31 PM2014-07-10T23:31:45+5:302014-07-10T23:31:45+5:30
जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत प्रत्येक पंचायत समिती स्तरावर अपंग, विशेष घटक योजना व महिला लाभार्थ्यांना नुकतेच सौर कंदिलाचे वाटप मोठा गाजावाजा करून करण्यात आले.
कोठारी : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत प्रत्येक पंचायत समिती स्तरावर अपंग, विशेष घटक योजना व महिला लाभार्थ्यांना नुकतेच सौर कंदिलाचे वाटप मोठा गाजावाजा करून करण्यात आले. मात्र त्यातील अर्धे अधिक कंदिल नादुरुस्त असल्याने गरिबांच्या घरातील प्रकाश कायम अंधारमय झाला आहे. या योजनेत महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
जिल्हा परिषदेतील महिला बाल कल्याण विभागाकडून पंचायत समितीतून सौर कंदिलासाठी अपंग, विशेष घटक योजना व महिलांकडून अर्ज मागविले होते. अर्ज मंजूर करून पंचायत समितीत महिलांना सौर कंदिलाचे वाटप करण्यात आले. आपल्या घरी असलेला अंधार सौर कंदिलाद्वारे दूर होऊन घर प्रकाशमय होण्याच्या आनंदात कंदिल घरी नेण्यात आले. रात्र होताच कंदिल लावण्याचा प्रयत्न केला असता कंदिलातून प्रकाश येत नव्हता. अधिकाऱ्यांनी वाटप करताना कंदिल सुरू करण्याबाबत सुचनांचे काटेकोर पालन करण्यात आले. मात्र मुळात कंदिल नादुरुस्त व निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यातून प्रकाशच येईना. सदर बाब संबधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आली. मात्र कंदिलाचा पुरवठा जिल्हा परिषदेने केल्याचे सांगून हात वर केले. सौर कंदिलाचा पुरवठा जि.प. ने केल्याने त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांची आहे. कंदिलाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून कमी किंमतीचे निकृष्ठ दर्जाचे, नादुरूस्त कंदिलाचा पुरवठा करण्यात आला. वाटप करताना कंदिलाची तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे घर प्रकाशमय करण्याच्या महिलांच्या आनंदावर विरजन पडले आहे. या कामात अधिकारी व कंत्राटदाराची कमीशनसाठी मिलीजुली असल्याचा संशय महिलांनी व्यक्त केला आहे. शासनाच्या गरीबांच्या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. आता या कंदिलाची दुरूस्ती होणार किंवा नादुरूस्त कंदिल परत बोलावून त्यांना नवीन कंदिल देण्यात येतील काय, असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.शासनाने गरीब महिलांना सौर कंदिलाचे वाटप केले. मात्र नादुरूस्त कंदिलाच्या वाटपाने या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बल्लारपूर पंचायत समितीत १४४ कंदिलाचे वाटप केले. मात्र त्यातील अर्धे कंदिल नादुरुस्त आहेत. सदर प्रकार सर्वच पंचायत समितीत असल्याचे समजते. त्यामुळे या कंदिल खरेदीत मोठा घोळ झाल्याचे समजते. नादुरुस्त कंदिल पुरविणाऱ्यांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. (वार्ताहर)