१७ लाख व्यक्तींना रेशनचे धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 05:00 AM2020-04-27T05:00:00+5:302020-04-27T05:00:51+5:30
लॉकडाऊनदरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्या २४७ प्रकरणात गुन्हा दाखल करून १३ लाख ३७ हजार ७० दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५८ जणांना अटक झाली असून ७४९ वाहने जप्त केली. पुढील आदेशापर्यंत लॉकडाऊन जैसे थे राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर: जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांना आतापर्यंत ९९ टक्के धान्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभ योजनेतंर्गत नियमित कुटुंबांचा समावेश आहे. प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ वाटपाचे कामही ९६ टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे १७ लाख व्यक्तींना धान्य वाटप केल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने रविवारी दिली.
जिल्ह्यामध्ये एकूण ३ लाख ९३ हजार ६५६ कार्डधारक आहेत. राज्य शासनाच्या शिव भोजन योजनेतंर्गत जिल्ह्यात १६ ठिकाणी असाह्य, विमनस्क, निराधार, बेघर लोकांना तयार अन्नाचे वाटप केले जात आहे. उन्हाळ्यात उत्तम दर्जाचे अन्न द्यावे, असा सूचना शिव भोजन कंत्राटदारांना देण्यात आल्या. जिल्ह्यस्तील राशन दुकानातून धान्य तसेच विविध ठिकाणी सुरू असलेल्या शिव भोजन केंद्रातून दर्जेदार थाळी मिळाली नाही तर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिला. लॉकडाऊनदरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्या २४७ प्रकरणात गुन्हा दाखल करून १३ लाख ३७ हजार ७० दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५८ जणांना अटक झाली असून ७४९ वाहने जप्त केली. पुढील आदेशापर्यंत लॉकडाऊन जैसे थे राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.
वाहनांची तपासणी करण्यासाठी पथक
बल्लारपूर : शहरात लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये, यासाठी दुचाकी वाहनांवरही बंदी करण्यात आली आहे. रेड झोनमधून शहरात प्रवेश करण्याऱ्या मालवाहू वाहनांच्या तपासणीकरिता बामणी टी पार्इंट तसेच पेपर मिल कलामंदिरजवळ तपासणी नाके उभारण्यात आले. शहरात प्रवेश करण्यापूर्वी मालवाहक वाहनांची तपासणी करून चालकाची संपूर्ण माहिती, वाहन कुठून निघाले व कुठे जाणार आहे, याची नोंद घेणे सुरू आहे. तपासणी नाक्यावर नगर परिषद, ग्रामीण रूग्णालय, तहसील कार्यालयाचे कर्मचारी व पोलीस तैनात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
तेलंगणातून आलेल्या १४ मजुरांचे क्वारंटाईन
चंद्रपूर : तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथून छत्तीसगड राज्यातील बालाघाट येथे जाण्यासाठी छुप्या मार्गाने शहरात आलेल्या १४ मजुरांची मनपा प्रशासनाने तपासणी करून महात्मा जोतिबा फुले प्राथमिक शाळेत क्वारंटान्ईन केले. तेलंगणा राज्यात अन्नधान्य उपलब्ध न झाल्याने उपासमारीच्या भितीने बिऱ्हाड घेऊन मूळ गावाकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असे मजुरांचे म्हणणे आहे. छत्तीसगड राज्यातील हे मजूर २२ एप्रिल रोजी हैदराबाद येथून निघाले होते. यामध्ये महिला व मुलांचा समावेश आहे. हे मजूर परराज्यातून ग्रीन झोन असलेल्या चंद्रपुरातील पठाणपुरा येथील मंदिराजवळ छुप्या मार्गाने आले होते. नागरिकांनी मनपा प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर लगेच आरोग्य पथकाने हिवरपुरी परिसरातील हनुमान मंदिराजवळ तपासणी करून १४ जणांना महात्मा जोतिबा फुले प्राथमिक शाळेत क्वारंटान्ईन केले आहे.
मोकाट जनावरांचे पाण्याअभावी हाल
घोडपेठ : लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. नागरिकही घराबाहेर पडत नाहीत. सोबतच उन्हाचा पारा तापू लागल्यामुळे मोकाट भटक्या जनावरांचा पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी भटक्या व मुक्या जनावरांकरिता घराबाहेर पाणवठे तयार करावे, असे आवाहन मुरसा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी केले आहे.
माहिती दडविल्याने चौघांविरूद्ध गुन्हा
घुग्घुस : जिल्हा बंदीचे उल्लंघन करून माहिती दडवून ठेवणाऱ्या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करून क्वारंटाईनसाठी चंद्रपूरला पाठविल्याची माहिती ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी दिली. रेड झोनमधून या जिल्ह्यात कुणीही येऊ नये, यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी सुरू आहे.
मास्क न घालणाऱ्हा ३२ जणांवर कारवाई
चिमूर : मास्क न घालणाऱ्या ३२ जणांवर नगर परिषदने कारवाई करून त्यांच्याकडून ६ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल केला. तालुक्यात सर्वत्र धडक कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. कारवाई झालेल्यांमध्ये काही व्यावसायिकांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
२ हजार ९१९ व्यक्तींचे होम क्वारंटाईन पूर्ण
नागभीड : लॉकडाऊन काळात जिल्हाबाहेरून आलेल्या ३ हजार १४१ पैकी २ हजार ९१९ जणांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून परत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींवर आरोग्य विभागाचे लक्ष ठेवले जात आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत अशा व्यक्तींचा शोध घेऊन होम क्वारंटान्ईन केले जाते. सध्या २२२ जणांचे होम क्वारंटान्ईन सुरू आहे.