जिल्ह्यात ३२ हजार ९५२ घनमीटर गाळ उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 11:23 PM2018-04-21T23:23:15+5:302018-04-21T23:24:03+5:30
शासनाच्या गाळयुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक तलाव-बोड्यांमधील गाळ उपसा केला जात आहे. त्यामुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनाच्या गाळयुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक तलाव-बोड्यांमधील गाळ उपसा केला जात आहे. त्यामुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मागील वर्षात ३२ हजार ९५२ घनमीटर गाळ उपसा झाला होता. तर चालू आर्थिक वर्षात या मोहिमेचा बुधवारपासून शुभारंभ करण्यात आला असून नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा अव्वलस्थानी आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अनेक तलावामधील गाळीचा उपसा झाला नव्हता. त्यामुळे तलावातील पाणी साठवण क्षमता कमी झाली. परिणामी पावसाळा संपताच तलावातील जलसाठ्यात घट होत होती. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना कार्यान्वित केली. या योजनेतून २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यातील २२ तलावातील गाळ काढण्यात आला. त्यातील ३२ हजार ९५२ घनमीटर गाळीचा उपसा करण्यात आला. उपसा केलेला गाळ शेतकºयांनी स्वत:च्या शेतात टाकला. गाळ काढण्यात आलेल्या तलावामध्ये चंद्रपूर तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. बल्लारपूर, राजुरा, कोरपना, चिमूर, मूल या तालुक्यातील प्रत्येकी एक, गोंडपिपरी-चार, भद्रावती, नागभीड तालुक्यातील दोन तर ब्रह्मपुरी तालुक्यात तीन तलावातील गाळ उपसा करण्यात आला.
गाळ काढण्यावर जवळपास ९ लाख ८८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला असून या कामांना लोकसहभाग मोठ्या प्रमाणात मिळाला. यंदा जवळपास ५० तलावातील गाळ उपसा केला जाणार असून जेसीबी मशीनद्वारे गाळ उपसा केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी स्वत:चे वाहन लावून आपल्या शेतात गाळ टाकावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना फायदा
तलावातील निघालेला गाळ शेतकºयांना शेतात टाकण्यासाठी प्रशासनाकडून सवलत दिली जात आहे. शेतकऱ्यांने स्व:ताचे वाहन करून गाळ उचलावे. वाहतुकीसाठी लागणारा डिझेलचा खर्च जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.