लोकसभेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:39 PM2019-03-11T22:39:42+5:302019-03-11T22:40:52+5:30

भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केल्यामुळे जिल्ह्यामध्ये तत्काळ प्रभावानुसार १० मार्चपासूनच आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. चंद्रपूर मतदार संघात या घोषणेनुसार ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.

District administration ready for Lok Sabha | लोकसभेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

लोकसभेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केल्यामुळे जिल्ह्यामध्ये तत्काळ प्रभावानुसार १० मार्चपासूनच आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. चंद्रपूर मतदार संघात या घोषणेनुसार ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. मात्र चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी या दोन विधान मतदार संघांचा समावेश असून राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी, आर्णी अशा सहा विधानसभा क्षेत्रांना मिळून हा लोकसभा मतदार संघ तयार झाला आहे.
१८ ते २५ मार्चपर्यंत नामांकन अर्ज
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात आवेदनपत्र भरण्याची सुरूवात १८ मार्चपासून होईल. आवेदनपत्र भरण्याची अंतिम तिथी २५ मार्च आहे. आवेदनपत्राची छाननी २६ मार्चला होईल. आवेदनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख २८ मार्च २०१९ आहे. उमेदवारांच्या अंतिम यादीची घोषणा २९ मार्च रोजी करण्यात येईल.
प्रचारात शासकीय वाहने नाहीत
शासकीय वाहने किंवा कर्मचारी, अधिकारी वर्ग किंवा यंत्रणा यांचा निवडणूक प्रचार विषयक कामासाठी वापर करण्यात येऊ नये. शासकीय वाहनांचा कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वापर करू नये. तसेच या काळामध्ये शासकीय कोषागाराच्या खर्चाने कोणतीही जाहिरात देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आचारसंहिता अंमलात आल्यामुळे उद्घाटन, भूमिपूजन आदी बाबींवरही निर्बंध घालण्यात आले असून मतदारांना प्रभावित करणाऱ्या कोणत्याही घोषणा केल्यास कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.

या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी प्रचाराची अंतिम तारीख ९ एप्रिल आहे. तर मतदान ११ एप्रिल रोजी होऊन मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. या मतमोजणीत चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचा नवा खासदार कोण असेल. हे जाहीर होणार आहे.

फलक लावण्यासाठी परवानगी आवश्यक
खासगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर कोणाचाही परवानगीशिवाय फलक लावणे, पक्षाचे झेंडे लावणे हा देखील आचारसंहितेचा भंग ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. लाऊडस्पीकरवरील प्रचाराच्या संदर्भात सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत प्रचार करता येणार आहे. मात्र परवानगीशिवाय हा प्रचार करता येणार नाही. या कालावधींचा उल्लंघन झाल्यास आचारसंहितेचा भंग म्हणून कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

जाहीर सभांमध्ये किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये मतदारांना आर्थिक किंवा अन्य प्रकारच्या प्रलोभनांना जाहीर करणे निर्बंधित असून मतदारांना जातीय किंवा धर्माच्या नावावर मते मागण्यासंदर्भात ही शासकीय यंत्रणेने करडी नजर ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक प्रचार काळामध्ये निवडणूक साहित्य लावण्यासाठी किंवा संदेश प्रक्षेपित करण्यासाठी धार्मिक स्थळांचा वापर केला जाणार नाही. याची काळजी घेण्याचे, आवाहन देखील करण्यात आले आहे.

१०० मिनिटात मिळेल उत्तर
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी यावेळी आदर्श आचारसंहितेचे पालन करताना जिल्ह्यामध्ये कुठलीही अनुचित घटना घडणार नाही. यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. निवडणूक वेबसाईटवर असणारी माहिती व वेळोवेळी निवडणूक आयोगाकडून येणाºया आदेशाची अंमलबजावणी प्रत्येकाने करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी निवडणूक आयोगातर्फे सीविजील अ‍ॅपदेखील सुरू करण्यात आले असून निवडणुकीच्या काळामध्ये सामान्य जनतेला देखील निष्पक्ष निवडणूक होण्यासाठी नवे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. याबाबतचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. या अ‍ॅपवरील कोणत्याही आक्षेपाला १०० मिनिटांच्या आत समाधानकारक उत्तर द्यायचे असल्याचेही त्यांनी सागिंतले.
मतदारांसाठी १९५० हेल्पलाईन क्रमांक
जिल्ह्यामध्ये मतदारांना असणाऱ्या अडीअडचणी व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक टोल फ्री हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेला आहे. १९५० या टोल फ्री क्रमांकावर कोणत्याही मोबाईल वरून व लँडलाईन् वरून दूरध्वनी करून आपली नावे मतदार यादीत आहे अथवा नाही व अन्य माहिती कार्यालयीन वेळेमध्ये दिली जाणार आहे. कोणत्याही अडचणी संदर्भात जिल्ह्यातील मतदारांनी १९५० या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले आहे.
2125 मतदार संघ
लोकसभा मतदारसंघामध्ये राजुरा (३५८), चंद्रपूर (३८५), बल्लारपूर (३६४), वरोरा (३३२) वणी (३२२), आर्णी (३६४) असे एकूण २१२५ मतदार केंद्राचा समावेश आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी निवडणूकीची घोषणा झाल्याच्या तारखेपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या तारखेपर्यंत उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
१८ लाख ८९ हजार ८९७ मतदार
३१ जानेवारी २०१९ रोजी अंतिम प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये १८ लक्ष ८९ हजार ८९७ मतदारांपैकी १७ लक्ष ९० हजार १८१ मतदारांकडे निवडणूक फोटो ओळखपत्रे उपलब्ध आहे. ही टक्केवारी ९४.७२ टक्के आहे.
सोशल मीडियावर ‘वॉच’
या निवडणूकीमध्ये सोशल मिडियावरील जाहिरातीदेखील निर्बंधित करण्यात आल्या असून सर्व उमेदवारांना सोशल मिडीया अकाउंटची माहिती देणे बंधनकारक आहे. सोशल मिडीयावर कोणत्याही जाहिराती दिल्या जाणार नाही, याची काळजी घेणे देखील उमेदवारांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: District administration ready for Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.