जिल्हा बँकेतील नोटाबंदीचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Published: November 17, 2016 01:47 AM2016-11-17T01:47:47+5:302016-11-17T01:47:47+5:30

केंद्र सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारण्यावर बंदी घातली आहे.

District bank lock-up kills farmers | जिल्हा बँकेतील नोटाबंदीचा शेतकऱ्यांना फटका

जिल्हा बँकेतील नोटाबंदीचा शेतकऱ्यांना फटका

Next

कुठे बदलणार नोटा? : राष्ट्रीयकृत बँकांचा अभाव, ग्रामीण नागरिकांचा ३० किमीचा प्रवास
आशिष देरकर  कोरपना
केंद्र सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारण्यावर बंदी घातली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण नागरिकांची दमछाक होत असून राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेच्या अभावामुळे नोटा बदलायचे कुठे, असा गंभीर प्रश्न ग्रामीण नागरिकांना पडला आहे.
मोठ्या शहरांमध्ये राष्ट्रीयकृत बँका असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा जिल्हाभर पसरलेल्या आहेत. सहकारी बँकांच्या माध्यमातून पीक कर्जाचे वाटप होत असल्याने सामान्य शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ओळखले जाते. बहुतांश ग्रामीण नागरिकांचे खाते जिल्हा बँकांमध्ये आहे. मात्र जवळील जुन्या नोटा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका स्वीकारत नसल्याने ग्रामीण लोकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यात केवळ ४ ते ५ राष्ट्रीयकृत बँका आहे. मात्र ५० टक्के लोकांचे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते नसून या बँकांमध्ये अनेक लोकांनी अजुनपर्यंत पाय ठेवलेला नाही. सुशिक्षीत लोकांना नोटा बदलविणे शक्य होत असले तरी म्हातारे, निरक्षर यांना नोटा बदलविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. राष्ट्रीयकृत बँका म्हणजे काय, असा प्रश्न अनेक नागरिक करीत आहे.
अनेक खेड्यातील लोकांना राष्ट्रीयकृत बँकेत जाण्याच्या सक्तीमुळे नोटा बदलविण्यासाठी ३०-३५ किलोमिटरचा प्रवास करावा लागत आहे. ५०० रुपयांची नोट बदलविण्यासाठी १०० रुपये खर्च होत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी होत आहे. अशातही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्याला बँकेतील गर्दी पाहून झोप उडत आहे. कारण खेड्यापाड्यातील सहकारी बँकांचे खातेदार राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नोटा बदलविण्यासाठी एकच गर्दी करीत आहेत. त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

धान कापणी, बांधणीची कामे उधारीवर
भेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव परिसरात धान उत्पादकांकडून धान कापणी, बांधणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र मोदी सरकारने काळ्या पैशाविरोधात बंड पुकारत १००० आणि ५०० च्या नोटा चलनातून बाद केल्याने त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या निर्णयाला आठवडा होत असला तरी आवश्यकतेनुसार नोटा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कापणी, बांधणीचे कामे उधारीवर करावी लागत आहे. त्यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या मजुरांचे हाल होत आहे.
यावर्षी धान कापणीची मजुरी परवडत नसल्याने स्थानिक मजूर वर्ग कापूस वेचणीच्या कामासाठी बाहेरगावी स्थलांतरीत झाल्याने कापणी व बांधणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहे. दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक पाऊस पडल्याने शेतकरी समाधानी होता. मात्र धानपिकांवर यावर्षी रोगाचे प्रमाण वाढल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला. महागड्या औषधांची फवारणी करूनही काहींना रोगावर नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. नवीन धानाचे भाव अद्यापही निश्चित झालेले नाही. तरी धानाला अडीच हजार रुपये क्विंटल हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)

पूर्ण दिवस जातो बँकेत
नोटा जरी बदलल्या असल्या तरी अजुनही जुन्याच नोटांवर अनेकांचे व्यवहार सुरू आहे. अनेकांनी जुन्या नोटा वापरून जुने देणी परत करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे दररोजच व्यवहार होत असल्याने एक दिवसाआड बँकेत नोटा बदलीसाठी जावे लागत आहे. यामुळे सारा दिवस बँकेत रांगेत लागण्यात जात आहे.
आधारबाबत जनजागृती नाही
दुर्गम भागातील नागरिक अजुनही फक्त बँक पासबुक किंवा जुन्या नोटा घेऊन बँकेत पोहचत आहेत. आधारकार्डबाबत जनजागृती नसल्याने आधारकार्ड न आणताच बँकेत येत आहे. त्यामुळे अशांना आल्यापावली परत जाऊन दुसऱ्या दिवशी आधारकार्ड घेऊन बँकेत यावे लागत आहे. त्यानंतरही बँकेच्या काऊंटरवर गेल्यास झेरॉक्स द्यावी लागत असल्याने रांगेत लागलेला नंबर मागे पडतो.
पाचशे द्या, चारशे घ्या
३०-३५ किमी अंतरावर जाऊन नोटा बदलविण्यासाठी बँकेत रांगेत लागून राहणे खर्चीक व वेळखाऊ ठरत असल्याने अनेकजण पाचशे रुपये घेऊन चारशे रुपये परत करीत आहेत. त्यामुळे मेहनतीचे पैसे वाया जात असल्याचे नागरिक सांगतात.
सहकारी बँका म्हणतात, आरटीजीएस करा
ग्रामीण भागातील जनतेला आरटीजीएस काय आहे अजून माहित नाही. जिल्हा सहकारी बँकांना पैसा न पोहोचल्याने ते ग्राहकांची मागणी पूर्ण करू शकत नसल्याची स्थिती आहे. अशातच तुमच्या खात्यातील रक्कम आरटीजीएस करून राष्ट्रीयकृत बँकेतून रक्कम उचला, असा सल्ला देण्यात येत आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकेचे खातेदार नसल्याने आरटीजीएसच्या सुविधेला अनेकांना मुकावे लागत आहे.

Web Title: District bank lock-up kills farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.