जिल्ह्यातील चित्रपटगृहे, योगा केंद्रे, जलतरण तलाव सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 05:00 AM2020-11-08T05:00:00+5:302020-11-08T05:00:41+5:30
प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील फक्त राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सरावाकरिता स्विमिंग पुल्स सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. तसेच योग वर्ग, सर्व इनडोअर खेळाअंतर्गत बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोअर शुटींग रेन्जेंस इत्यादी खेळास सामाजिक अंतर राखून मुभा देण्यात येत आहे. यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश लागू असतील. सिनेमाघर, मल्टीप्लेक्स, नाट्यगृह सुरू करण्यास एकूण क्षमतेच्या ५० टक्के बैठक व्यवस्थेच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्याचे मुख्य सचिव यांच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यात ५ नोव्हेंबरपासून निर्बंध शिथील करणे व टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविणे अंतर्गत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेश निर्गमित केले आहेत. जिल्ह्यातील चित्रपटगृहे, योगा केंद्र, जलतरण तलाव, इनडोअर खेळ याला अटींवर परवानगी दिली आहे.
प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील फक्त राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सरावाकरिता स्विमिंग पुल्स सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. तसेच योग वर्ग, सर्व इनडोअर खेळाअंतर्गत बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोअर शुटींग रेन्जेंस इत्यादी खेळास सामाजिक अंतर राखून मुभा देण्यात येत आहे. यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश लागू असतील. सिनेमाघर, मल्टीप्लेक्स, नाट्यगृह सुरू करण्यास एकूण क्षमतेच्या ५० टक्के बैठक व्यवस्थेच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. परंतु या सर्व ठिकाणी कोणत्याही खाण्यायोग्य वस्तुंना विकण्याची किंवा घेवून जाण्याची परवानगी राहणार नाही. यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना सांस्कृतिक कार्य विभाग तथा स्थानिक प्रशासनाद्वारे लागू असतील.मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड-19 प्रतिबंधक मार्गदर्शक निदेर्शांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
१५१ कोरोनामुक्त, १३२ नवे बाधित
जिल्ह्यात शनिवारी १५१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १३२ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १६ हजार ७८६ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १३ हजार ८४३ झाली आहे. सध्या दोन हजार ६९१ बाधितांवर उपचार सुरू आहे. शनिवारी आढळलेल्या 132 बाधितांमध्ये ८७ पुरुष व ४५ महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परिसरातील ५८, पोंभुर्णा तालुक्यातील तीन, बल्लारपूर तालुक्यातील दोन, चिमूर तालुक्यातील पाच, मूल तालुक्यातील चार, गोंडपिपरी तालुक्यातील चार, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील आठ, ब्रह्मपुरी तालुक्यातील १४, नागभीड तालुक्यातील ११, वरोरा तालुक्यातील दोन, भद्रावती तालुक्यातील नऊ, सिंदेवाही तालुक्यातील दोन, राजुरा तालुक्यातील आठ तर गडचिरोली येथील एकाचा समावेश आहे.
तीन बाधितांचा मृत्यू
शनिवारी जिल्ह्यात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात बल्लारपूर शहरातील मौलाना आझाद वार्ड येथील ४६ वर्षीय पुरुष, कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील ७० वर्षीय पुरुष व भाकर्डी येथील ३८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५२ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २३६ बाधितांचा समावेश आहे.