जिल्ह्याच्या मागणीने पुन्हा उचल खाल्ली

By Admin | Published: January 8, 2017 12:43 AM2017-01-08T00:43:34+5:302017-01-08T00:43:34+5:30

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र सरकारमधील हेवीवेट मंत्री नितीन गडकरी हे नागभीडला येत आहेत.

The district demand again | जिल्ह्याच्या मागणीने पुन्हा उचल खाल्ली

जिल्ह्याच्या मागणीने पुन्हा उचल खाल्ली

googlenewsNext

मुख्यमंत्र्यांच्या आगमनाचे निमित्त : आमचाच जिल्हा करा; ब्रह्मपुरी व नागभीडकरांची मागणी
ब्रह्मपुरी/नागभीड : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र सरकारमधील हेवीवेट मंत्री नितीन गडकरी हे नागभीडला येत आहेत. या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी व नागभीडकरांची जिल्ह्याची मागणी पुन्हा गुंजू लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्याच तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी प्रत्येकजण करताना दिसत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्रह्मपुरी उपविभागात येत असलेल्या नागभीड शहरात राष्ट्रीय महामार्गाच्या भूमीपूजनासाठी येत आहेत. त्यांच्या येण्याने पुन्हा एकदा ब्रह्मपुरीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत व या निमित्याने ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीला पूर्ण करण्याची विनंती ब्रह्मपुरीकरांकडून केली जात आहे.
सन १९८२ ला संयुक्त चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनासाठी नविन जिल्ह्याचा विचार शासनदरबारी करण्यात आला होता. तेव्हा गडचिरोलीला प्राधान्य देऊन ब्रह्मपुरीवर अन्याय करण्यात आला. गेल्या ३५ वर्षापासूनची ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी दुर्लक्षित आहे. मुख्यमंत्री हे विदर्भाचे सुपुत्र असून राज्याचे प्रतिनिधीत्व करीत आहात. त्यांना ब्रह्मपुरी स्थानाविषयी सर्वकाही माहित आहे. एवढेच नव्हे तर ते ब्रह्मपुरीला यापूर्वी अनेकदा येवून गेले आहेत. त्यामुळे ब्रह्मपुरीच्या शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय वातावरणाची कल्पना आहे. सर्वदृष्ट्या एक अग्रगण्य तालुका म्हणून ब्रह्मपुरीची ओळख आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर ब्रह्मपुरीकडे उपजिल्ह्याच्या नजरेतून पाहत आहेत. ब्रह्मपुरीवर होत असलेला अन्याय आतातरी मुख्यमंत्र्यांनी दूर करावा, अशी अपेक्षा ब्रह्मपुरीकरांची आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आगमनाने दुसरीकडे नागभीडकरांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. नागभीडचे मध्यवर्ती स्थान लक्षात घेवून चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी नागभीडमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र सरकारमधील हेवीवेट मंत्री नितीन गडकरी व अन्य अनेक महत्वपूर्ण नेत्यांना आमंत्रित करून एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचवेळी चिमूरमध्ये जिल्ह्याच्या मागणीने जोर धरला आहे. पण जिल्हा निर्मिती होणारच असेल तर नेतृत्वानेही नागभीडचे मध्यवर्ती स्थान लक्षात घेवून नागभीडलाच जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशा प्रतिक्रिया नागभीड, ब्रह्मपुरी व सिंदेवाही या तालुक्यातून येत आहेत.
चिमूर चंद्रपूर जिल्ह्याच्या एका टोकाला आहे. ब्रह्मपुरी ते चिमूर हे अंतर ६५ किमी आहे. नागभीडही ४५ किमी आहे. सिंदेवाहीचे असेच आहे. शिवाय चिमूरला जाण्यासाठी रेल्वेची कोणतीही सोय नाही. उलटपक्षी नागभीड हे एक असे स्थान आहे की ते चिमूर, ब्रह्मपुरी आणि सिंदेवाहीलाही मध्यवर्ती आहे. ब्रह्मपुरी आणि सिंदेवाहीकरांना नागभीडला येण्यासाठी रेल्वेची सुविधा उपलब्ध आहे.
असे असूनही या सुविधांचा आणि नागभीडच्या मध्यवर्ती स्थानाचा कोणताही सारासार विचार न करता राजकीय नेतृत्वाकडून चिमूरला जो अग्रक्रम देण्यात येत आहे. तो खरं म्हणजे नागभीड, ब्रह्मपुरी आणि सिंदेवाही या तीन तालुक्यांना आणखी समस्येच्या खाईत लोटल्यासारखे आहे. आम्हाला समस्येच्या खाईत लोटण्यापेक्षा वाहतुकीच्या सर्व सुविधा उपलब्ध असलेले चंद्रपूर काय वाईट, अशी मते आता नागरिकच व्यक्त करू लागली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मध्यवर्ती ठिकाण म्हणून जिल्ह्यासाठी नागभीडचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी यानिमित्ताने नागभीडवासीयांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The district demand again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.