जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या सावटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:40 AM2017-09-10T00:40:59+5:302017-09-10T00:41:17+5:30
जिल्ह्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेती ही निसर्गावर अंवलबून आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे अंदाज वर्तवले होते. मात्र मागील चार महिन्यात पावसाचे एकही नक्षत्र समाधानकारक पाऊस न पडताच निघून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेती ही निसर्गावर अंवलबून आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे अंदाज वर्तवले होते. मात्र मागील चार महिन्यात पावसाचे एकही नक्षत्र समाधानकारक पाऊस न पडताच निघून गेले. परिणामी अनेक शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली. कसेबसे पीक वाढले, तर ते जगविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नदी-नाले एकदाही दुथडी भरून वाहले नाही. जिल्ह्यातील प्रकल्पही अद्याप कोरडेच आहे. यामुळे जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या सावटात दिसत आहे.
नद्या, नाले अजूनही तहानलेलेच
दरवर्षी पावसाळ्यात पुराने हाहाकार उडविणाºया चंद्रपूर जिल्ह्यातील नद्या यंदा पावसाळा संपूनही कोरड्याच आहेत. दरवर्षी या कालावधीत नद्या दुथडी भरून वाहात असत. वर्धासारख्या मोठ्या नदीत जेमतेम पाणी आहे. इतर नद्यांचे तर पात्र कोरडेच आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची चाहुल लागत आहे. काही ठिकाणी पावसाळ्यातच उन्हाळ्यागत स्थिती आहे.पाण्यामुळ शेतपिके धोक्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात जलसंकटाची चिन्हे दिसत आहे. खरीप हंगामच पाण्याविना जात आहे तर रब्बीची पिके कशी घ्यायची, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. जिल्ह्यात वर्धा नदीसारख्या मोठ्या नद्या बारमाही पाणी वाहणाºया नद्या आहेत. दरवर्षी या नद्यांच्या तीरावरील गावांना पुराचा फ टका बसतो. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात हमखास पूर येत असते. मात्र यंदा पावसाळा संपत आला असला तरी नद्यांचे पात्र कोरडेच दिसत आहेत. लहान नाले तर पाण्यासाठी आतुर झालेले आहेत. यंदा तुषार सिंचनासारखा पाऊस पडत असल्याने कोणत्याही नदीला पूर आलेला नाही. परिणामी आगामी काळात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याचे संकेत देत आहे.
राजुरा तालुक्यातील डोंगरगाव मध्यम प्रकल्पात या पावसाळ्यात १० टक्केच पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे सिंचनाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया शेतकºयांची चिंता वाढली आहे. गावातील तलावांमध्ये ठणठणाट आहे. पाऊस कमी झाल्यामुळे जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न शेतकºयांची चिंंता वाढविणारा ठरत आहे. यंदा सुरूवातीपासूनच चांगला पाउस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. मात्र हा अंदाज फोल ठरला. जून, जुलै महिन्यात पावसाची टक्केवारी केवळ १५ ते २० टक्के इतकी आहे. आॅगस्ट महिन्यात केवळ काही दिवसच पावसाने हजेरी लावली. पावसाळ्यातच पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होताना दिसत आहे. यावर शासनाने आताच उपाययोजना करावी, अन्यथा पाण्यासाठी वनवन भटकण्याची पाळी येण्याची शक्यता आहे.