जिल्हा व्यसनमुक्त करणार
By admin | Published: November 29, 2014 11:17 PM2014-11-29T23:17:22+5:302014-11-29T23:17:22+5:30
दारूबंदी करणे हा समाजाच्या हिताचा निर्णय असून यासाठी सर्व जिल्हावाशियांच्या सहकार्याची गरज आहे. जिल्ह्यात दारूबंदी सोबतच व्यसनमुक्त करण्याचा निर्धार असल्याचे मत अर्थ नियोजन व
सुधीर मुनगंटीवार : व्यसनमुक्तीच्या प्रसार प्रसिद्धीसाठी चार कोटींची तरतूद
चंद्रपूर : दारूबंदी करणे हा समाजाच्या हिताचा निर्णय असून यासाठी सर्व जिल्हावाशियांच्या सहकार्याची गरज आहे. जिल्ह्यात दारूबंदी सोबतच व्यसनमुक्त करण्याचा निर्धार असल्याचे मत अर्थ नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित व्यसनमुक्ती कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, अॅड. पारोमिता गोस्वामी, सभापती ईश्वर मेश्राम, देवराव भोंगळे व सविता कुडे आदी उपस्थित होते.
दारूबंदी नंतर उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने तत्पर राहावे असेही त्यांनी सांगितले. व्यसनमुक्तीचे कायदे अंमलात आणले पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहतांना नमूद केले. अशी आठवण करून देत मुनगंटीवार म्हणाले, आता ती वेळ आली आहे. जिल्ह्यात व्यसनमुक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी समाज कल्याण विभागासाठी पुरवणी मागण्यामध्ये चार कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.
आपला जिल्हा महाराष्ट्राची प्रेरणा झाली पाहिजे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. दारुबंदी नंतर व्यसनमुक्तीसाठी आरोग्य विभाग आणि सामाजिक संघटनांवर मोठी जबाबदारी येणार आहे. दारूबंदी नंतर आरोग्याच्या समस्या उद्भवणार आहे. त्यासाठी औषधीसाठा कमी पडू दिला जाणार नाही. आरोग्यावर होणारे परिणाम व त्यासाठी लागणारी औषध यासंबंधी आरोग्य विभागाने बैठक घेऊन आढावा घ्यावा, असे त्यांनी सुचविले.
यावेळी डॉ. पालीवार यांनी व्यसनमुक्ती व आरोग्य यासंदर्भात विचार मांडले. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी दारूपासून होणाऱ्या सामाजिक दुष्परिणामाचा आढावा घेतला. समाज कल्याण अधिकारी विजय वाकुलकर यांनी सामाजिक न्याय विभागाच्या व्यसनमुक्ती कार्यक्रमासंदर्भात मनोगत व्यक्त केले.
पारोमिता गोस्वामी यांनी आपल्या दारूमुळे संसार उद्धवस्त झालेल्या महिलांचे अनुभव सांगितले. दारूबंदी नंतर होणाऱ्या आजाराबाबत आम्ही दक्षता घेवू तसेच व्यसनमुक्तीसाठी पूरेपूर सहकार्य करू असे त्यांनी सांगितले, (नगर प्रतिनिधी)