इमारत नूतनीकरणावर जिल्हा निधीचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2016 01:22 AM2016-01-14T01:22:12+5:302016-01-14T01:22:12+5:30

जिल्ह्यातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. मदतीसाठी शेतकऱ्यांचा टाहो सुरू आहे.

District fund slip on building renovation | इमारत नूतनीकरणावर जिल्हा निधीचा चुराडा

इमारत नूतनीकरणावर जिल्हा निधीचा चुराडा

Next

दुष्काळात तेरावा महिना : सदस्यांना विकास कामांसाठी निधीच नाही
मंगेश भांडेकर चंद्रपूर
जिल्ह्यातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. मदतीसाठी शेतकऱ्यांचा टाहो सुरू आहे. शासनाच्या योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून तसेच नव्या योजना राबवून त्यांना दिलासा देण्याची सध्या गरज आहे. मात्र जिल्हा परिषदेचे सत्ताधारी सध्या आपली निवासस्थाने व कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात व्यस्त आहेत. विशेष म्हणजे, हे नूतनीकरण जिल्हा निधीतून होत आहे. जिल्हा परिषद सदस्यांना त्यांच्या क्षेत्रात विकास कामांसाठी दिला जाणारा निधी इमारत नूतनीकरणावर खर्च होत असल्याने हा प्रकार म्हणजे निधीचा चुराडा व दुष्काळात तेरावा महिना असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे.
जिल्हा परिषद कार्यालयातील तळ मजला व पहिल्या माळ्याचे नूतनीकरण करण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे. तळ मजल्यावर असलेले अधिकाऱ्यांच्या कक्षांना टाईल्स लागल्याने चमक आली आहे. पहिल्या माळ्यावरील पदाधिकाऱ्यांच्या कक्षांनाही टाईल्स लावण्याचे काम सुरू असून हे काम प्रगतिपथावर आहे. तर जिल्हा परिषदेचे मुख्य प्रवेशद्वार व संरक्षन भिंतीचेही काम प्रगतिपथावर आहे. या कामांसाठी तब्बल १ कोटी १५ लाखांचा खर्च येणार असल्याची माहिती आहे.
मात्र हा खर्च जिल्हा निधीतून केला जात असल्याने जिल्हा परिषद सदस्यांना त्यांच्या क्षेत्रात नाली बांधकाम, रस्ते, रंगमंच बांधकामासाठी दिला जाणारा तीन ते चार लाखांच्या निधीपासून मुकावे लागले आहे. जिल्हा निधीतून प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांना तीन ते चार लाख रूपये त्यांच्या क्षेत्रात विकास कामे करण्यासाठी दिले जातात.
मात्र या जिल्हा निधीचा जिल्हा मुख्यालय चंद्रपुरातच चुराडा होत असल्याचे अनेक सदस्यांचे म्हणणे आहे. तर पदाधिकाऱ्यांची याबाबत विचारणा केली असता, काहींनी जिल्हा निधी तर काहींनी तेरावा वित्त आयोग निधीतून ही कामे सुरू असल्याचे सांगितले.

Web Title: District fund slip on building renovation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.