जिल्हा सामान्य रुग्णालय हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2016 12:45 AM2016-10-27T00:45:17+5:302016-10-27T00:45:17+5:30
गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलाने सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी असे विविध आजार बळावले आहेत.
विविध आजार बळावले : उपचारासाठी ग्रामीणांची गर्दी
चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलाने सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी असे विविध आजार बळावले आहेत. परिणामी ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना विविध आजाराची लागण झाली असून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी वाढली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात नोंदणीसाठी रांगाच रांगा दिसून येतात. यामध्ये विविध आजारग्रस्तांचा समावेश आहे. ताप, हागवण, उलटी असे आजारग्रस्त रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपाचारासाठी दाखल होत आहेत. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध पदे रिक्त असल्याने रुग्णालयातच रुग्णांची उपचारासाठी धावपळ सुरु असल्याचे चित्र दिसून आले.
वातावरणातील बदलामुळे अनेक गावात आजाराचे प्रमाण वाढले आहे. काही गावांमध्ये डेंग्युसदृष्य तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे गावकऱ्यांत भिती पसरली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
स्वच्छतेकडे दुर्लक्ष
जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. याकडे मात्र, आरोग्य कर्मचारी दुर्लक्ष करित असल्याने अस्वच्छतेचा सामना रुग्णांना करावा लागत आहे. रुग्णालयाच्या भिंतीवर सर्वत्र थुंकण्यामुळे पिचकाऱ्या असून काही ठिकाणी कचरा साचला आहे.
रुग्णांची गैसोय
जिल्हा सामान्य रुग्णालय रुग्णांनी हाऊसफूल्ल आहे. त्यामुळे अनेकांना खाटांची व्यवस्था नाही. फरशीवर बसून उपचार करुन घेताना अनेक रुग्ण आढळून आले. या रुग्णांकडे आरोग्य कर्मचारी लक्ष देत नसल्याचे रुग्णांनी सांगितले.