जिल्हा ‘लॉकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 06:00 AM2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:50+5:30
रेल्वे प्रवासी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर अशा प्रवाशांची सविस्तर माहिती नोंदविण्यासाठी प्रवाशांना नोंदणी कक्षामध्ये नेण्यात आले. नंतर त्यांची थर्मल स्क्रिनिंग करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला. नंतरच त्यांना रेल्वे स्थानकांवरून घरी पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आपली माहिती स्वत:हून देणे आवश्यक आहे. माहिती लपविल्याचे लक्षात आल्यास त्यांच्यावर सीआरपीसीच्या १८८ व आयपीसीच्या २६९, २७० कलमान्वये कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश शनिवारी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. चंद्रपूर शहरांमध्ये जिल्हा बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांवर प्रशासन लक्ष ठेवत असून शनिवारी पुण्यावरून विशेष रेल्वेने आलेल्या १०८५ प्रवाशांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. बल्लारपूर येथे काही जण शनिवारी पुण्यावरून आले. त्यांनाही होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. बल्लारपूर येथे स्वत: जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, यांच्यासह बल्लारपूर नगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. पुण्यावरून आलेल्या सर्व नागरिकांनी पुढील १४ दिवस घरातच राहावे, असे स्पष्ट निर्देश त्यांना देण्यात आले असून या सर्व नागरिकांच्या हातावर होम कॉरेन्टाईनचे स्टॅम्प मारण्यात आले आहे. यासोबतच रविवारपासून चंद्रपूर लाकडाऊन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. तसेच बाधित रुग्णांची संख्यासुद्धा वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाने सक्त पाऊले उचललेली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यासंदर्भात शनिवारी यासंदर्भात सक्त निर्देश जारी करताना विदेशातून आलेल्या नागरिकांनी व पुणे येथून आलेल्या सर्व प्रवाशांनी पुढील १४ दिवस घरातच राहावे, असे स्पष्ट केले आहे. सुजाण नागरिक बनून आपल्या घरातील अन्य सदस्य व समाजातील सदस्यांसोबत संपर्कात येऊ नये. अन्य नागरिकांचीदेखील स्वत: सोबत काळजी घ्यावी. कोरोनासोबत लढतांना संपर्क न येऊ देणे. ही सर्वात मोठी बाब असून त्यासाठी कोरोना प्रसारणाची कडी तोडावी लागणार आहे. त्यासाठी रविवारपासून कोणीही आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडता कामा नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता चंद्रपुरातील सर्व दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
रेल्वे स्थानकावर होम क्वारंटाईनच्या प्रक्रियेच्या वेळेस उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपायुक्त गजानन बोकडे, चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौंड, स्टेशन मास्तर के. एस. एन. मूर्ती, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. किर्ती राजुरवार, डॉ. वनिता गर्गेलवार तसेच राज्य व रेल्वे पोलीस अधिकारी तर जिल्हा आरोग्य विभागाचे, महानगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील बाजारपेठातही शुकशुकाट
चंद्रपूर : जिल्ह्यात ब्रह्मपुरी शहरात सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी दिले आहे.शहरातील चित्रपटगृहे, कोचिंग क्लासेस, आठवडी बाजार, जनावरांचे बाजार, सर्व पर्यटन स्थळ, उद्याने शाळा, महाविद्यालय, अंगणवाडया, पानठेले, ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागभीडसह तालुक्यातील तळोधी बा.येथील बाजारपेठही बंद असल्यामुळे शनिवारी सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. वरोरासह वरोरा तालुक्यातील शेगाव येथील बाजारपेठही बंद झाली आहे. सिंदेवाही शहरातील दुकानेही शनिवारपासून कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहे. नागभीड तालुक्यातील सावरगाव येथेही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. चिमूर शहरातील बहुतांश दुकाने शनिवारी बंद ठेवण्यात आली.
पानठेला, खर्रा विक्री केंद्र निगराणीवर
कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर पानठेला, खर्रा विक्री केंद्र सुरु राहू नये. तसेच तंबाखुजन्य साहित्याच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे जलद जप्ती पथक स्थापन करण्यात आले असून शहरात कुठेही पानठेला, खर्रा विक्री केंद्र सुरु दिसल्यास किंवा कुठलीही व्यक्ती सदर साहित्याची विक्री करताना आढळल्यास नागरिक या पथकाकडे तक्रार दाखल करू शकतील. प्राप्त होणा-या तक्रारींची नोंद घेऊन तक्रार प्राप्त झाल्यापासून पुढील ३० मिनिटांच्या कालावधीत जलद कार्यवाही या पथकाद्वारे केली जाणार आहे.
व्यावसायिकांवर गुन्हे दाखल
नागभीड : सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी येथील व्यावसायिक नंदू डोईजड याच्याविरोधात नागभीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर परिषद कर्मचारी उमाकांत बोरकर यांचे तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
तर चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील ग्रामपंचायत वतीने सर्व व्यापार पेठ बंद करण्याचे आवाहन शुक्रवारी करण्यात आले होते. परंतु एका व्यापाºयाने दुकान उघडून साहित्य दिल्यामुये ग्रामपंचायतीने व्यापाºयावर दंड ठोकला. याशिवाय बल्लारपूर येथील साईबाबा वार्डातील एका पानठेलाचालकाने खर्रा विक्री सुरू ठेवल्यामुळे त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पाचपेक्षा अधिक व्यक्ती दिसल्यास कारवाई
जिल्ह्यामध्ये १४४ जमावबंदीची कलम लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्रित येऊ शकत नाही.अशा पद्धतीने कुठेही जमाव दिसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.
अशी झाली प्रक्रिया
रेल्वे प्रवासी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर अशा प्रवाशांची सविस्तर माहिती नोंदविण्यासाठी प्रवाशांना नोंदणी कक्षामध्ये नेण्यात आले. नंतर त्यांची थर्मल स्क्रिनिंग करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला. नंतरच त्यांना रेल्वे स्थानकांवरून घरी पाठविण्यात आले. या प्रक्रियेमध्ये रेल्वे स्थानकावर एकूण १० नोंदणी कक्ष, ५ थर्मल स्क्रीनिंग कक्ष व एक होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यासाठी कक्ष उभारण्यात आले होते.