वृक्ष लागवडीसाठी जिल्हा सज्ज

By admin | Published: July 1, 2017 12:34 AM2017-07-01T00:34:53+5:302017-07-01T00:34:53+5:30

संपूर्ण महाराष्ट्राला ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देणारे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गृहजिल्ह्यात शनिवारपासून विक्रमी वृक्ष लागवडीला प्रारंभ होणार आहे.

District ready for plantation of trees | वृक्ष लागवडीसाठी जिल्हा सज्ज

वृक्ष लागवडीसाठी जिल्हा सज्ज

Next

वनमहोत्सवाला आजपासून प्रारंभ : रविवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत चंद्रपुरात मुख्य कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : संपूर्ण महाराष्ट्राला ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देणारे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गृहजिल्ह्यात शनिवारपासून विक्रमी वृक्ष लागवडीला प्रारंभ होणार आहे. यावर्षी जिल्ह्याला २८ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून किमान ३ ते ४ लाख अधिक वृक्ष लागवड करण्यासाठी वनविभाग, वनविकास महामंडळ, सामाजिक वनीकरण व सामाजिक संस्था कामी लागल्या आहेत. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत रविवारी मुख्य कार्यक्रम होणार असून शनिवारी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पोंभुर्णा येथे वृक्षारोपण होणार आहे.
गेल्या वर्षीपासून वनविभागाने जंगलाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. राज्याच्या एकूण भूभागाच्या २० टक्के जंगल राज्यात आहे. हे प्रमाण ३४ टक्के असणे गरजेचे आहे. ना. मुनगंटीवार यांनी वनखात्याची धुरा स्वत:कडे घेतल्यानंतर सर्व जिल्ह्यात वनाच्छादित प्रदेश वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेण्यात आले होते. या मोहिमेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला होता. यात २ कोटी ८२ लाख वृक्ष लागवड करण्यात आली.
जानेवारी महिन्यापर्यंत गतवर्षी करण्यात आलेल्या वृक्षलागवडीपैकी ९१ टक्के वृक्ष जिवंत होती. त्यामुळे यावर्षी आणखी सूक्ष्म नियोजन करुन ४ कोटी वृक्षलागवडीचे नियोजन वनविभागाने केले आहे. पुढच्या वर्षी १३ कोटी तर त्यापुढील वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन असून एकूण ५ वर्षात ५० कोटी वृक्ष लावण्यात येणार आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात वनविभाग व संबंधित संस्थांनी यावर्षी रेकार्डब्रेक वृक्षलागवड करण्याची व वृक्ष संवर्धन करण्याची मोहिम आखली आहे.
मुख्य कार्यक्रम २ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता प्रस्तावित मेडीकल कॉलेजजवळ गट क्रमांक ५०३ मध्ये होणार आहे.
शनिवारी मुनगंटीवार यांच्या हस्ते नवी मुंबईमधील येरोली परिसरात वनमहोत्सवाचा प्रारंभ करणार आहेत. २ जुलैला डम्पींग ग्राऊड येथे महापौर अंजली घोटेकर यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेने देखील वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दुपारी ३ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला पालकमंत्री उपस्थित राहणार आहे.
१ जुलैला पोंभूर्णा येथील घनोटी गावात जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते जिल्ह्यातील पहिल्या प्रमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्ह्यात ठिकठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये व व्यक्तीगत ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे.

वृक्षदिंडीची धूम
यावर्षी राज्यात पहिल्यांदा चंद्रपूर जिल्हा परिषदेने वृक्षलागवड व संवर्धनासाठी वृक्षदिंडी काढण्याचा विक्रम केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात १५ तालुक्यातील ५० गावात वृक्ष संवर्धन व संगोपनाची वृक्षदिंडी काढण्यात आली असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. त्याचा मोठा लाभ यावर्षी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
कोण, किती लावणार वृक्ष
१ ते ७ जुलै या काळात सर्वात जास्त वृक्ष लावण्याची जबाबदारी वनविभागाने घेतली आहे. वनविभाग १७ लाख २८ हजार वृक्ष लावून व त्याचे संगोपन करणार आहे. वनविकास महामंडळ ८ लाख ८१ हजार, जिल्ह्यातील ५२८ ग्रामपंचायती मिळून ४ लाख १३ हजार, ३४ शासकीय यंत्रणा २ लाख ५० हजार, सामाजिक वनीकरण विभाग १ लाख वृक्ष लावणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाने यावर्षी सर्व ग्रामपंचायतीना वृक्ष पोहचविण्याचे काम केले आहे. मोठ्या प्रमाणात रोपे देण्यात आली असून चंद्रपूरमध्ये दोन महोत्सव केंद्र सुरु करण्यात आले आहे. रेंजर आॅफिस व मुख्य वनसंरक्षक कार्यालय येथून सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करुन देण्यात येत असून महानगरपालिकेने देखील कचरा उलचणाऱ्या घंटागाडीला रोपे पुरविणारी पूरक यंत्रणा बनवत घरोघरी रोपे पुरविण्याचे काम सुरु केले आहे.

Web Title: District ready for plantation of trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.