जिल्हा पाणी टंचाईच्या सावटात

By admin | Published: November 29, 2015 01:57 AM2015-11-29T01:57:06+5:302015-11-29T01:57:06+5:30

चंद्रपूर जिल्ह्यावर सध्या पाणी टंचाईचे सावट दिसून येत आहे. यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धरणामधील जलसाठा नोव्हेंबरमध्येच चिंताजनक स्थितीत पोहचला आहे.

District water shortage | जिल्हा पाणी टंचाईच्या सावटात

जिल्हा पाणी टंचाईच्या सावटात

Next

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यावर सध्या पाणी टंचाईचे सावट दिसून येत आहे. यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धरणामधील जलसाठा नोव्हेंबरमध्येच चिंताजनक स्थितीत पोहचला आहे. शेतकऱ्यांसमोर आतापासून सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला असला तरी उद्योगांकडून पाण्याचा उपसा सुरूच असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढे जिल्ह्यात पाणी प्रश्न तोंडचे पाणी पळविणार आहे.
यावर्षी खरीप हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र अत्यल्प पाऊस पडल्याने अनेकांना पेरणी करता आली नाही. तर ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून गेली. धान पट्ट्यात अनेकांना रोवणी करता आली नाही. तर ज्यांनी केली त्यांची पिकेही शेवटच्या पाण्यासाठी अखेरची घटका मोजत आहेत. त्यामुळे खरिप हंगामात यावर्षी उत्पन्न घटल्याचे दिसून आले.
खरिप हंगामात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. उत्पादन खर्चही निघणार की नाही, याची शंका अनेकांना आहे. आता तरी रबी हंगामात पेरणी करून खरिपात झालेले कर्ज फेडण्याचे अनेक शेतकरी विचार करीत होते. त्यामुळे धान, सोयाबीन, कापूस आदी पिके अंतिम टप्प्यात असून रबी पीक पेरणीसाठी बियाणे जुळवाजुळव शेतकऱ्यांनी सुरू केलीे. असे असले तरी यावर्षी रबी हंगामात सिंचनाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. अत्यल्प पाऊस झाल्यामुळे यावेळी सिंचन प्रकल्पातही मुबलक जलसाठा होऊ शकला नाही. खरीप हंगामातच शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला. धानाला पाणी देण्यासाठी नदी-नाल्यात पाणी नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेताजवळ नदी-नालेही नाही. खरीप पिकांचीच ही अवस्था आहे तर रबी पिकांना सिंचनासाठी पाणी कुठून मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही.
नोव्हेंबर महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला आहे. एरवी हिवाळ्याला प्रारंभ होतो तेव्हा जिल्ह्यातील जलाशयात बऱ्यापैकी जलसाठा राहतो. मात्र यावेळी पाऊसच पडला नसल्याने बहुतांश जलाशय चिंताजनक स्थितीत आहेत. आसोलामेंढा प्रकल्पात केवळ १४.७२ टक्के पाणी आहे. घोडाझरी प्रकल्पात १८.७१ टक्के जलसाठा आहे. नलेश्वर प्रकल्प तर कोरडे होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पात केवळ ४.३९ टक्के पाणी आहे. चंदई प्रकल्पात १३.४४ टक्के पाणी आहे तर चारगाव प्रकल्पातही केवळ ४१.३१ टक्के जलसाठा आहे. दिना प्रकल्पात तर ठणठणाट आहे.
प्रकल्पाच्या या स्थितीमुळे पाण्याची पातळी खालावली असून उन्हाळ्यात भिषण जिल्हा प्रशासनाने आतापासून पाण्याचे व्यवस्थित नियोजन केले नाही तर पुढे जिल्हाभर पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: District water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.