नागपूर शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणीत जिल्हा आघाडीवर
By admin | Published: October 13, 2016 02:27 AM2016-10-13T02:27:03+5:302016-10-13T02:27:03+5:30
नागपूर शिक्षक मतदार संघाकरिता यापूर्वी नोंदणी झालेल्या शिक्षक मतदारांच्या याद्या न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आल्या आहे.
चंद्रपूर : नागपूर शिक्षक मतदार संघाकरिता यापूर्वी नोंदणी झालेल्या शिक्षक मतदारांच्या याद्या न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे नागपूर शिक्षक मतदार संघात नव्याने शिक्षक मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यात चांदा शिक्षण प्रसारक मंडळाने सामाजिक कार्य म्हणून शिक्षक मतदार नोंदणीसाठी सक्रिय सहभाग घेतला आहे.
संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जीवतोडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांना मतदानासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
सर्व संघटनांना मतदार फॉर्म भरण्याची अंतिम ५ नोव्हेंबर असल्यामुळे व २१ आॅक्टोबरपासून माध्यमिक शाळांना व १७ आॅक्टोबरपासून सिनियर कॉलेजना दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे. त्यामुळे डॉ. अशोक जीवतोडे यांनी शिक्षक मतदार नोंदणी कार्यक्रम हा सामाजिक उपक्रम समजून त्यानुसार जिल्ह्यातील मतदार नोंदणीचे जाहीर आवाहन केले आहे.
त्याला चंद्रपूर जिल्ह्यातील प्रचार्य फोरमचे डॉ. एम. सुभाष, मुख्याध्यापक संघटनेच्या अध्यक्षा संध्या गोहोकार, माणूसमारे, उपाध्यक्ष बी. बी. माथने, विजुक्ता संघटनेचे अशोक पोफळे, एमसीव्हीसी, आयटीआय शिक्षक संघटनेचे सुधीर चवरे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, शिक्षक परिषद संघटनेचे राजीव श्रीरामवार, दिवाकर पुदद्दटवार, शिक्षक भारती संघटनेचे गर्गेलवार, प्रजासत्ताक शिक्षक भारती संघटनेचे ढुमने यांनी मतदार नोंदणी सर्व शिक्षकांनी करुन घ्यावी असे आवाहन केले आहे.
माध्यमिक शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, व्यवसाय अभ्यासक्रमाचे शिक्षक, वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक मतदान नोंदणी करण्यासाठी पात्र आहेत. त्यासाठी नोंदणी कार्ड क्रमांक व एक फोटो नोंदणी फार्मला लावून मुख्याध्यापकामार्फत मतदार नोंदणी अधिकारी तहसीलदार, नायब तहसीलदार यांना सादर करता येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)