रमाई आवास योजनेसाठी जिल्ह्याचे उद्दिष्ट सात हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 10:10 PM2019-02-08T22:10:18+5:302019-02-08T22:10:34+5:30
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास घरकूल योजनेसाठी (ग्रामीण) जिल्ह्याचे उद्दिष्ट आता सात हजार करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास घरकूल योजनेसाठी (ग्रामीण) जिल्ह्याचे उद्दिष्ट आता सात हजार करण्यात आले आहे.
मागील सरकारच्या कार्यकाळातील तुलनेत सदर योजनेसाठी एकून उद्दिष्टात युती सरकारच्या काळात तिप्पट वाढ झाली आहे. शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने याबाबत शुक्रवारी परिपत्रक जारी केले. सन २०१८-१९ या वर्षाकरिता ४ हजार ५०० मंजूर उद्दिष्ट होते. त्यामध्ये २ हजार ५०० अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर केले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे एकूण उद्दिष्ट ७ हजार झाले आहे.
जानेवारी २०१९ मध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत रमाई आवास घरकूल योजना (ग्रामीण) साठी लाभार्थ्यांची मागणी लक्षात घेता मंजूर उद्दिष्ट अपूरे पडत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनाला आली होती. परिणामी, संबंधित विभागाला अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर करण्यासाठी त्याच बैठकीत तत्काळ निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्याच्या एकूण उद्दिष्टात २ हजार ५०० घरकूलांनी वाढ झाली आहे. याआधी २०१०-११ मध्ये ५१२, सन २०११-१२ मध्ये ९५०, सन २०१२-१३ मध्ये ३७०, सन२०१३-१४ मध्ये २२०, सन २०१४-१५ मध्ये १ हजार याप्रमाणे युती सरकारच्या कार्यकाळात ३ हजार ५२ आणि २०१५-१६ मध्ये ३९० सन २०१६-१७ मध्ये १ हजार २५२, सन २०१७-१८ मध्ये २ हजार तसेच सन २०१८-१९ मध्ये सात हजार याप्रमाणे युती सरकारच्या कार्यकाळात १० हजार ६४२ इतके उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. आघाडी सरकारच्या कार्यकाळातील तुलनेत युती सरकारच्या कार्यकाळात उद्दिष्टातील ही वाढ तिप्पट झाली आहे.
ना. मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदर योजनेचे एकूण उद्दिष्ट सात हजार झाले आहे. त्यामुळे रमाई आवास योजनेचा लाभ घेणाºया नागरिकांची अडचण दूर झाली आहे. या योजनेपासून आता पात्र कुटुंब वंचित राहणार नाही.