दिव्यांग प्रदीपकुमारचा दहा हजार किमीचा सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 03:11 PM2018-04-10T15:11:32+5:302018-04-10T15:11:46+5:30

आपण दिव्यांग असलो तरी काय झालं, असे म्हणत मध्य प्रदेशातील ३० वर्षीय प्रदीपकुमार सायकलने भारत यात्रेला निघाला आहे. दहा हजार किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण करून तो १८ जूनला रेकॉर्ड नोंदविणार आहे.

Divyaag Pradipkumar's ten thousand km cycling journey | दिव्यांग प्रदीपकुमारचा दहा हजार किमीचा सायकल प्रवास

दिव्यांग प्रदीपकुमारचा दहा हजार किमीचा सायकल प्रवास

Next
ठळक मुद्दे१८ जूनला नोंदविणार रेकॉर्डशरीर स्वास्थाच्या जनजागृतीसाठी भारत यात्रा

मंगेश भांडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हीच जिद्द उराशी बाळगून आपण दिव्यांग असलो तरी काय झालं, असे म्हणत मध्य प्रदेशातील ३० वर्षीय प्रदीपकुमार सायकलने भारत यात्रेला निघाला आहे. दहा हजार किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण करून तो १८ जूनला रेकॉर्ड नोंदविणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून तो अनेक मोठ्या शहरांमध्ये स्वच्छ भारत, निरोगी भारत, पर्यावरण, रस्ते सुरक्षा याबाबत जनजागृती करीत आहे.
प्रदीपकुमार सेन हा सायकलने प्रवास करीत मंगळवारी चंद्रपुरात पोहोचला. यावेळी त्याने मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांची भेट घेवून त्याच्याकडून सुरू असलेल्या जनजागृतीची माहिती दिली. तेव्हा जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी त्याचे कौतुक केले.
मुळचा मध्यप्रदेश राज्यातील इंदौर येथील रहिवासी असलेला प्रदीपकुमार सेन हा २५ वर्षांचा असताना १० आॅगस्ट २०१३ ला एका रस्ते अपघातात त्याचा डावा पाय पूर्णपणे निकामी झाला. त्यामुळे त्याला चालता येणेही शक्य नव्हते. त्यामुळे त्याने कृत्रिम पाय बसवून घेतले. रस्ते अपघातात आपला पाय निकामी झाला, असे अनेक अपघात देशात घडतात आणि अनेकांना अपंगत्व येते. त्यामुळे यावर जनजागृती झाली पाहिजे, यासाठी त्याने भारत यात्रा करण्याचा निश्चय केला.
१४ नोव्हेंबर २०१७ ला त्याने इंदौर येथून भारत यात्रेला सुरूवात केली. त्याची ही यात्रा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामीलनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडीसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश या राज्यातून दिल्ली येथे पोहोचणार आहे. १८ जूनला ही यात्रा पूर्ण होवून दहा हजार किमी सायकल प्रवासाचा येथे रेकॉर्ड नोंदविला जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रातील अनेक मोठे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रदीपकुमारने ‘लोकमत’शी बोलताना दिली.

दिवसभरात शंभर ते दीडशे किमीचा प्रवास
एका पायाने दिव्यांग असूनही कृत्रिम पायाच्या बळावर प्रदीपकुमार सायकलद्वारे भारत यात्रेला निघाला आहे. डोक्याला हेल्मेट व पाठीवर जवळपास २५ ते ३० किलो वजनाची विविध साहित्य असलेल्या बॅग आहे. या यात्रेदरम्यान अनेक मोठ्या शहरातील मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, शालेय विद्यार्थी व नागरिकांच्या भेटी घेवून तो स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, पर्यावरण, रस्ते सुरक्षेचा संदेश देत आहे. दिवसभरात शंभर ते दीडशे किमीचे अंतर पार करीत असल्याचे त्याने ‘लोकमत’ला सांगितले.

रस्ते सुरक्षा अभियानाचा अ‍ॅम्बेसेडर
या अभियानाला सुरूवात करण्यापूर्वी प्रदीपकुमारने अनेक केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. एका पायाने दिव्यांग असलेल्या प्रदीपकुमारची जिद्द पाहून अनेकजण थक्क झाले. अशातच केंद्रीय रस्ते व वाहतूक विभागाच्या प्रमुख राणी निगोंट यांनी प्रदीपकुमारला रस्ते सुरक्षा अभियानाचा अ‍ॅम्बेसेडर बनविण्याची इच्छा व्यक्त केली. सायकलद्वारे १० हजार किलोमीटरची भारत यात्रा पूर्ण होताच प्रदीपकुमारची रस्ते वाहतूक विभागाचा अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती होणार असल्याचे त्याने सांगितले.

Web Title: Divyaag Pradipkumar's ten thousand km cycling journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य